उपमुख्यमंत्री फडणवीस  File Photo
पुणे

फडणवीसांकडून विद्यार्थी आंदोलनाची दखल

पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षांच्या जाहिराती संदर्भात अडचणी निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्पर्धा परीक्षार्थींनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाची तत्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटरच्या माध्यमातून अराजपत्रित गट - ब, गट - क संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात येत्या काही दिवसांत काढण्यासंदर्भात एमपीएससीच्या आयोगाच्या अध्यक्षांशी चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.

यासंदर्भात स्पर्धा परीक्षार्थिंनी दिलेल्या माहितीनुसार,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्पर्धा परीक्षार्थींनी विविध मागण्यासंदर्भात अराजकीय आंदोलन केले. शास्त्री रोडवरील मागील आंदोलनाचा अनुभव पाहता पोलिस प्रशासनाने शास्त्री रोड, अलका टॉकीज चौक, बालगंधर्व चौक येथे आंदोलनास परवानगी नाकारली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि उमेदवारांचा राजकीय वापर होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन उमेदवारांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अराजकीय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाची तत्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटरच्या माध्यमातून अराजपत्रित गट - ब, गट - क संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात येत्या काही दिवसांत काढणार असल्याचे स्पष्ट केले.

स्पर्धा परीक्षार्थींच्या प्रमुख मागण्या

  • संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क 2024 परीक्षेची जास्तीत जास्त जागांची जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करावी.

  • महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 ही बहुपर्यायी पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेतून भरल्या जाणार्‍या पदांची संख्या जास्तीत जास्त असावी.

  • जलसंपदा विभाग, कनिष्ठ अभियंता( स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) प्रलंबीत जाहिरात लवकरात लवकर यावी.

काय आहे उपमुख्यमंत्र्यांचे टि्वट

शासन सेवेतील गट ब आणि क पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक उमेदवारांनी माझ्याकडे मागणी केली होती. त्यानुसार एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या उमेदवारांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आम्ही आंदोलन केले. संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क परीक्षेची जाहिरात , राज्यसेवा परीक्षेमधील पदांची वाढ, जलसंपदा विभाग, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) जाहिरात या आमच्या मागण्यांपैकी एका प्रमुख मागणी संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटरच्या माध्यमातून संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क परीक्षेची जाहिरात येत्या काही दिवसात काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आम्ही आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. परंतु येत्या काळात आमच्या सर्व मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर आम्ही पुन्हा एकदा शास्त्री रोडवर आंदोलन करण्यावर ठाम आहोत.
नितीन आंधळे, स्पर्धा परीक्षार्थी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT