पुणे; पुढारी वृत्तसेवा : सात-सात, आठ-आठ तासाचा प्रवास करून दमून-भागून आलेल्या प्रवाशांना आता पुणे रेल्वे स्थानकावर आराम मिळणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकावर 'कीऑक्स' चेअर मसाजची व्यवस्था प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्याचे उद्घाटन रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानकावर विमानतळ, मॉलमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे स्थानकावर आराम क्षेत्र ( रिलॅक्सिंग झोन) किऑस्कच्या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बॉडी मसाजचा आनंद घेता यावा, यासाठी "आरामा" कंपनीच्या तीन रोबोटिक मसाज खुर्च्या उपलब्ध करून दिल्या आहेत. हे किओस्क प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर असून, बेंगळुरू स्थित रोबोटिक टेक्नॉलॉजीज कंपनीद्वारे हे चालवले जात आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पाच मिनिटांसाठी 60/- रुपये, 10 मिनिटांसाठी 100/- रुपये, 15 मिनिटांसाठी रु.150/- आणि 20 मिनिटांसाठी रु. 180/- आकारले जातील.
मसाज खुर्चीच्या फायद्यांमध्ये रक्त संचरण सुधारणे, स्नायूंचा ताण कमी होणे, पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम, शारीरिक आकार सुधारणे आणि झोपेची गुणवत्ता सुधारणे यांचा समावेश होतो. लोक 12 ते 48 तासांच्या प्रवासानंतर थकतात. कोणत्याही कारणास्तव ट्रेन लेट झाली तर प्रवासात त्रास होतो व थकवा आल्याने कामावर परिणाम होतो. घरी पोहोचूनही लोकांना थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत स्थानकावर असलेले मसाज चेअर किऑस्क प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे.