ई-नाम Pudhari
पुणे

ई-नाममध्ये अडत्यांमार्फत शेतकर्‍यांना ई-पेमेंट सुविधा

पुढारी वृत्तसेवा

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या ई-नामद्वारे होणार्‍या शेतमाल व्यापारातील विक्रीची रक्कम अडत्यांमार्फत थेट ई-पेमेंटद्वारे करण्याची सविधा केंद्र सरकारने आता समाविष्ट केलेली आहे. त्यामुळे शेतमालाची ऑनलाइन व्यापार-व्यवहारात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार असल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.

केंद्र सरकारने देशपातळीवर ‘एक बाजार’ या संकल्पनेवर आधारित ई-नाम ही योजना सुरू केली आहे. या योजनेचे कामकाज ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्म व मोबाईल अ‍ॅपद्वारे सुरू आहे. केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेअंतर्गत देशातील 1 हजार 389 बाजार समित्या ई-नामला जोडल्या असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील 133 बाजार समित्यांचा समावेश आहे. ई-लिलावाद्वारे सोयाबीन, हरभरा, मका, गहू, ज्वारी, हळद, तूर, उडीद, कांदा, डाळिंब, कोबी, रेशीमकोष या शेतमालाची प्रामुख्याने विक्री करण्यात येते. शेतमालाची गुणवत्ता तपासणीसाठी 118 बाजार समित्यांमध्ये प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत.

प्रचलित पद्धतीनुसार राज्यातील बाजार समित्यांमधील अडते शेतमालाच्या विक्रीचे नियोजन करून शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीची रक्कम देतात. ई-नाम कार्यप्रणालीनुसार नोंदणीकृत व्यापार्‍याने ई-लिलाव केल्यानंतर ई-नाम संगणक प्रणालीमार्फत ई-पेमेंट करतात. या ई-पेमेंटमध्ये शेतकर्‍यांचे पेमेंट, बाजार समितीची बाजार फी व अडत यांचा समावेश असतो. एकंदरीत ई-नाममध्ये व्यापारी हा केंद्रबिंदू आहे. पेमेंट अडत्यांमार्फत केले जाते. यामुळे अडत्यांना ई-नाम संगणक प्रणालीमध्ये ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्याचा विचार करून केंद्राने आता अडत्यांसाठी वजनाची पावती तयार करणे, सेल अ‍ॅग्रिमेंट व सेल बिल, ई-पेमेंट करणे, डॅशबोर्डद्वारे सुरू असलेले ई-लिलाव पाहणे, या सुविधांचा नव्याने ई-नाम संगणक प्रणालीमध्ये समावेश करून कार्यान्वित केल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात आत्तापर्यंत ई-नाम बाजार समित्यांमध्ये सप्टेंबर 2017 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत एकूण 476 लाख क्विंटल शेतमालाचा ई-लिलाव झाला आहे. त्याची किंमत 17 हजार 607 कोटी रुपये आहे.

शेतमाल घेऊन जाण्यापूर्वी गेट एन्ट्री करू शकतात. या गेट एन्ट्रीचा क्यूआर कोड तयार होत असून, हा क्यूआर कोड बाजार समितीच्या गेटवर स्कॅन केल्यानंतर त्या शेतमालाबाबतची नोंद (गेट एन्ट्री) ई-नाम संगणक प्रणालीमध्ये होणार आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर होणारी गर्दी टाळता येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT