पुणे: कोथरूड परिसरातील बांधकाम व्यावसायिकाला आदित्य बिर्ला मनी-व्हीआयपी ग्रुपमध्ये सहभागी करून घेत शेअर स्टॉक खरेदी करून गुंतवणूक केल्यास चांगल्याप्रकारे अल्पावधीत नफा मिळेल, असे आमिष दाखवून एक कोटी 32 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी प्रमोद सवदत्ती (वय 53) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य बिर्ला मनी व्हीआयपी व्हॉट्सअॅप ग्रुप, अज्ञात लिंकधारक, मोबाईल वापरकर्ते, बँक खातेधारक व वापरकर्ते, एबीएमएलआयसी अॅपधारक व वापरकर्ते, ई-मेल आयडीधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 नोव्हेंबर 2024 ते 4 फेब्रुवारी 2025 दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रमोद सवदत्ती हे सिव्हिल इंजिनिअर असून, त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांना सुरुवातीला आयना जोसेफ नावाच्या व्यक्तीने संर्पक करून तसेच विविध अनोळखी मोबाईलधारक यांनी संपर्क करत आदित्य बिर्ला मनी व्हीआयपी या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले.
त्यात एबीएमएलआयसी अॅप डाऊनलोड करण्यास सांगून संगनमताने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ट्रेडिंग स्टॉकच्या माध्यमातून तक्रारदार यांना त्यांचे खाते तयार करण्यास लावले. त्यांना सदर अॅपच्या माध्यमातून स्टॉक खरेदी-विक्री करण्यास सांगून सुरुवातीला थोडी रक्कम देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.
आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर तक्रारदार यांनी वेळोवेळी एक कोटी 32 लाख 55 हजार रुपये ऑनलाइन खात्यात ट्रान्स्फर केले.त्याबदल्यात चोरट्यांनी त्यांना केवळ पाच हजार रुपये परतावा देऊन त्यांची मूळ रक्कम परत न करता फसवणूक केली आहे. याबाबत पुढील तपास सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यशवंत निकम करत आहेत.