पुणे

मेट्रोचा विस्तार कात्रजपर्यंत; पिंपरी ते निगडी मार्गाची घोषणा

अमृता चौगुले

पिंपरी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये पुणे मेट्रोची 8313 कोटी रुपयांची कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. तसेच निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रोचाही त्यांनी उल्लेख केला. या विस्तारीकरणाला केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर वर्षभरात ती कामे सुरू होतील.

पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या 17 किलोमीटर मार्गाचा दोन्ही बाजूंना विस्तार होईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडीपर्यंत विस्तार करण्याच्या प्रस्तावाला दोन वर्षांपूर्वी मान्यता दिली. तो राज्याने केंद्र सरकारकडे पाठविला होता. मात्र, एकत्रित प्रस्ताव पाठविण्याची सूचना केंद्राने त्या वेळी केली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिकेपासून निगडीपर्यंत विस्तारासाठी 946 कोटी रुपये खर्च होणार आहे. त्या उन्नत मार्गावर तीन स्थानके बांधण्यात येतील. हा उन्नतमार्ग 4.4 किलोमीटर लांबीचा आहे. स्वारगेट ते कात्रज दरम्यानचा भुयारी मार्ग सुमारे साडेपाच किलोमीटर लांबीचा आहे. दोन्ही बाजूंचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर कात्रज ते निगडी हा मेट्रो मार्ग सुमारे 27 किलोमीटर लांबीचा होईल.

पिंपरी चिंचवड महापालिका भवनापासून फुगेवाडीदरम्यानच्या सुमारे सात किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गावरून मेट्रो गेले वर्षभर धावत आहे. तेथून पुण्यातील न्यायालयापर्यंत पुढील महिन्यात मेट्रो पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून पुण्यात प्रवाशांना मेट्रोतून ये-जा करता येईल. निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार झाल्यास, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्वांना या मेट्रोचा फायदा होईल.

पुण्यात कृषी महाविद्यालयाच्या मैदानापासून स्वारगेटपर्यंतचा भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे. शिवाजीनगर आणि न्यायालय येथील स्थानकाची कामेही जवळपास पूर्ण झाली आहेत. बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट येथील स्थानकांची बहुतांश कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. येत्या वर्षअखेरपर्यंत ती पूर्ण झाल्यानंतर, मेट्रो स्वारगेटपर्यंत धावू लागेल. स्वारगेट ते कात्रजपर्यंतच्या भुयारी मार्गावर तीन स्थानके आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर पूर्ण होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागेल.

महामेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्यानंतर सुमारे 33 किलोमीटर मार्गावरून मेट्रो धावू लागेल. त्याचबरोबर हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किलोमीटर मार्गावरील मेट्रोचे काम सुरू असून, येत्या दोन वर्षांत त्या मार्गावरील मेट्रो धावू लागेल. त्याच कालावधीत महामेट्रोच्या प्रकल्प एकमध्ये निगडी आणि कात्रज या दोन्ही विस्तारित मार्गांचा समावेश केलेला आहे. या व्यतिरिक्त पुण्यातील सुमारे 82 किलोमीटर मार्गांवर मेट्रोचा दुसर्‍या टप्प्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

शहरातील मोठ्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष
पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यावश्यक असलेली बंद पडलेली पवना जलवाहिनी योजना, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून 267 एमएलडी पाणी आणून शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करणे, पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना, सुमारे 32 किलोमीटर अंतराची एचसीएमटीआर (रिंग रोड), इंद्रायणीनगर, भोसरी ते चाकण निओ मेट्रो प्रकल्पाबाबत राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा होईल, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. मात्र, या महत्वपूर्ण व मोठ्या प्रकल्पांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यासंदर्भात काहीच घोषणा केली गेली नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला राज्य शासनाकडून पुन्हा ठेंगा मिळाला आहे.

पिंपरी ते निगडी या मार्गावरील चिंचवड (चिंचवड स्टेशन चौक), आकुर्डी (खंडोबा माळ चौक) आणि निगडी (शक्ती-शक्ती समूह शिल्प चौक) असे तीन मेट्रो स्टेशन आहेत. हे अंतर 4.41 किलोमीटर इतके आहे. ते काम दुसर्‍या टप्प्यातील असल्याने त्यासाठी पुन्हा नव्याने निविदाप्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कामात हे काम केले जाणार आहे. या विस्तारीत मार्गाचा एकूण खर्च 946 कोटी 76 लाख इतका आहे. कामास किमान 3 वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर निगडी ते दापोडी या संपूर्ण 12.50 किलोमीटर मार्गावर मेट्रोची कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. तसेच, पुण्यातील स्वारगेट व कात्रजपर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT