पुणे: एक दिवस अचानक थकवा, जुलाब, उलट्या असा त्रास जाणवायला लागला. व्हायरल इन्फेक्शन असेल, असा विचार करून नेहमीच्या डॉक्टरकडे जाऊन औषध घेतले. चौथ्या दिवशी सकाळी उठल्यावर खांद्यातून हातही उचलता येईना. पायही खूप जड झाले. डॉक्टरांनी तातडीने हॉस्पिलटमध्ये अॅडमिट व्हायला सांगितले.
तपासण्यांमधून जीबीएसचे निदान झाले. तब्बल 15 दिवस आयसीयूमध्ये होतो. आता पूर्वीपेक्षा खूप बरे वाटत आहे. डॉक्टरांनी 15 दिवसांची औषधे आणि फिजिओथेरपीचा सल्ला दिला आहे. जीबीएसवर मात करता आल्याने दिलासा मिळाला... हा अनुभव आहे धायरी येथील 47 वर्षीय सोमनाथ पाटील यांचा.
गेल्या काही दिवसांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांचा आकडा बर्यापैकी आटोक्यात आला आहे. दररोज एक-दोन रुग्णांचीच नोंद होत आहे. तसेच, जीबीएसमधून बरे होऊन 98 टक्के रुग्ण घरी गेले आहेत. रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून दै. ’पुढारी’च्या प्रतिनिधीने त्यांचा प्रवास जाणून घेतला.
या वेळी लवकर निदान झाल्याने आणि त्वरित उपचार घेतल्याने जीबीएसवर मात करता आल्याचे सकारात्मक अनुभव जीबीएसमुक्त झालेल्या नागरिकांनी कथन केले आहेत. किरकटवाडी येथील 26 वर्षीय धीरज पवार म्हणाले, सलग तीन-चार दिवस लक्षणे जाणवू लागल्यावर तपासणी केली असता जीबीएसचे निदान झाले.
आजार पूर्णपणे नवा असल्याने आधी माझ्यासह कुटुंबातले सदस्यही घाबरले होते. मात्र, तातडीने आयव्हीआयजी इंजेक्शनचा डोस सुरू करण्यात आला. आठ दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो. व्हेंटिलेटरची गरज भासली नाही. बरे वाटू लागल्यावर घरी सोडण्यात आले. आता हळूहळू प्रकृतीत सुधारणा होत आहे. सध्या केवळ फिजिओथेरपीचे उपचार सुरू आहेत.
मुलाच्या स्नायूंना हळूहळू पुन्हा बळकटी मिळाली
आमच्या 6 वर्षीय मुलामध्ये जीबीएसचे निदान झाल्यानंतर आमच्या पायाखालची जमीन कोसळली. तज्ज्ञांनी प्रसंगावधान राखत वेळीच योग्य उपचार केल्याने आता त्याने शारीरिक हालचालींना सुरुवात केली आहे. त्याच्या स्नायूंना हळूहळू पुन्हा बळकटी मिळत आहे. 12 दिवसांनी माझ्या मुलाला हसताना आणि त्याचा आवाज ऐकून पाहून मला खूप छान वाटले, अशी प्रतिक्रिया एका चिमुरड्या रुग्णाच्या आईने व्यक्त केली.
जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे तो एका व्यक्तीपासून दुसर्याकडे संक्रमित होणार नाही. रुग्णांमधील आजाराची तीव्रता लक्षात घेऊन योग्य उपचार दिले जात आहेत. त्यामुळे रुग्ण तीन-चार आठवड्यांमध्ये बरे होत आहेत. घरी गेल्यानंतर सकस आहार, प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे आणि फिजिओथेरपी या उपचारांनी रुग्णाची स्थिती निश्चितपणे पूर्ववत होते.- डॉ. दीपक रानडे, न्यूरोलॉजिस्ट