पुणे

उत्पादनच नाही, तर ‘शुल्क दिवस’ कसला?

अमृता चौगुले

दिनेश गुप्ता

पुणे : 'अहो, कुठलाही दिनविशेष साजरा करायचा म्हणजे औचित्य लागते. पूर्वी ज्या खात्याला केंद्रीय उत्पादन शुल्क असे नाव होते त्याचे नाव आता 'जीएसटी भवन' झाले आहे. म्हणजेच, तिथे उत्पादनच नाही, तर त्यांना कसा शुल्क आकारणार आणि त्याचा डे कसा साजरा करणार? 2017 पासून आम्ही राष्ट्रीय उत्पादन शुल्क दिवस साजरा करणे बंद केले आहे,' अशी माहिती पुणे विभागातील आयुक्तांच्या स्वीय सचिवांनी दिली.

पुणे व गोवा विभागासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग म्हणजे आत्ताचे जीएसटी भवन पुण्यातील राजभवनसमोर आहे. येथे विविध विभागांच्या कामांसाठी आयुक्त कार्यरत आहेत. 24 फेब्रुवारी हा दिवस 'केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस' म्हणून साजरा केला जात होता. 2017 पासून या विभागाचे नामकरण बदलून 'जीएसटी भवन' असे करण्यात आले. विभागाचे नाव काय बदलले, जणू हा दिवस साजरा करणे अधिकारी व कर्मचारी विसरून गेले. 'पुढारी'च्या चमूने यासंदर्भात विविध आयुक्तांकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वांकडून एकच उत्तर आले ते म्हणजे, 'आता उत्पादनाचा काही विशेष राहिला नाही, तर मग कर कसा आकारणार. म्हणून आम्ही आता हा डे साजरा करणे बंद केले आहे.'

मुख्य आयुक्तांनीही टाळले…

जीएसटी भवनचे मुख्य आयुक्त श्रीनिवास मूर्ती टाटा यांना भेटून दिनाचे औचित्य आणि केलेली कार्यवाही, याबाबत प्रत्यक्ष भेटून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनीदेखील या 'डे'बाबत बोलण्याचे टाळले. जुलैमध्ये या मग सविस्तर माहिती देतो, असे सांगत भेटीसाठी त्यांनी नकार दिला. सरकार काहीही ठरवत असले तरी ते साजरे करण्याचे आम्ही ठरवतो, असा निरोप त्यांनी सचिवांमार्फत देत बोलण्याचे टाळले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT