पुणे: पुणे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता बाबूराव पवार यांच्यासह उपअभियंत्याला लाचप्रकरणी निलंबित करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले आहेत. त्याशिवाय आणखी एका कनिष्ठ अभियंत्याला जिल्हा परिषदेने यापूर्वीच निलंबित केले आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. कर्मचारी आणि अधिकार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनापर्यंत अद्याप बांधकाम विभागाकडून निलंबनाचे आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारी अभियंता पवार आणि पठारे हे दोन्ही अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेअंतर्गत कार्यरत आहेत. त्यामुळे त्या दोन अधिकार्यांचे निलंबन करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेऐवजी बांधकाम विभागाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या निलंबनाबाबतचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठविला होता. त्याबाबत बांधकाम विभागाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला.
या प्रस्तावानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने बाबूराव पवार आणि पठारे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. बाबूराव पवार यांच्यासह तिघांना आता निलंबित करण्याची जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही मोठी कारवाई मानली जाते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील (दक्षिण) कार्यकारी अभियंता बाबूराव पवार, उपअभियंता दत्तात्रय पठारे आणि कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे या तीन अधिकार्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यापैकी कनिष्ठ अभियंता बगाडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.