‘रेडीरेकनर’च्या बैठकीला लोकप्रतिनिधींची दांडी File Photo
पुणे

‘रेडीरेकनर’च्या बैठकीला लोकप्रतिनिधींची दांडी

केवळ एकाच आमदार बैठकीला हजर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रेडीरेकनरचे दर ठरविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला जिल्ह्यातील एक आमदार वगळता इतर सर्व लोकप्रतिनिधी अनुपस्थित होते. दरवर्षी रेडीरेकनरचे दर निश्चित करून त्याची अमंलबजावणी 1 एप्रिलपासून केली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हे दर बदलण्यात आलेले नाहीत.

यंदा रेडीरेकनर दर वाढविण्यात येणार, अशी चर्चा आहे. याबाबत मंगळवारी (दि. 28) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांना आमंत्रित करण्यात येते.

लोकप्रतिनिधी रेडीरेकनरबाबत सूचना करतात. या सूचना राज्य सरकारकडे पाठविण्यात येतात. राज्य सरकार त्यावर चर्चा करून त्याचा अंतर्भाव करण्याबाबत निर्णय घेते. त्यानंतर रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगाणे तसेच त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींमधून केवळ वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे हे एकमेव आमदार उपस्थित होते. नवीन वर्षात रेडीरेकनर दर वाढवायचे किंवा कमी करायचे, याबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना आल्याच नाहीत, तर पठारे यांनी यंदा महागाई वाढलेली असल्याने रेडीरेकनर दर वाढवू नयेत, अशी सूचना केली.

अन्य लोकप्रतिनिधींना सामान्यांसाठी महत्त्वाच्या असणार्‍या या विषयाबाबत उदासीनता असल्याचे दिसून आले. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT