पिंपरी(पुणे) : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावरील छत्रपती चौकात एका गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी खोलवर मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने रस्ता खचला आहे, तसेच पाणीपुरवठा वाहिनी व स्ट्रॉर्म वॉटर वाहिनी तुटली. ही दुर्घटना गुरुवारी (दि. 20) पहाटेच्या वेळेस घडली. सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नाही.
कुणाल आयकॉन रस्त्यावर प्लॅनेट मिलेनियम सोसायटीजवळ एका बांधकाम व्यावसायिकाचे व्यापारी व निवासी इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे महापालिका अधिकार्याने सांगितले. इमारतीच्या तळघरासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. काळी माती असल्याने जमीन खचून सुरक्षेसाठी केलेले काँक्रीटीकरण पत्रे व फळ्यासह तुटले. भूस्खलन झाल्याने आधार निघाल्याने रस्ता खचला.
हा प्रकार पहाटेच्या वेळेस रस्त्याने वाकिंग करणार्या नागरिकांनी पाहिला. त्यांनी महापालिका, पोलिस व अग्निशमन विभागास कळविले. महापालिकेचे अग्निशमन विभाग, आपत्कालीन यंत्रणा व पोलिसांनी तातडीने घटनास्थळास भेट देऊन त्या भागात बॅरिकेड्स लावले. जलवाहिनी तुटल्याने परिसरातील पाणीपुरवठा दिवसभर विस्कळीत झाल्याने रहिवाशांची गैरसोय झाली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा वाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले.
भूभाग खचल्याने जलवाहिनी तुटली आहे. पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. रात्री साडेआठच्या सुमारास काम पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
बांधकाम करताना तळमजल्या खाली एक ते दोन मजली प्रशस्त पार्किंग केले जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात येते. खोदकाम करताना सुरक्षा कठड्यांना काँक्रीटचा भक्कम आधार देणे अत्यावश्यक आहे. खोदकाम करताना काळी माती लागल्यास काळजीपूर्वक काम करावे लागते. बांधकाम करताना नियमाकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे पालिका अभियंत्यांनी सांगितले.
सुखवानी रामचंदानी एलएलपी या बांधकाम व्यावसायिकाने व्यापारी व निवासी इमारतीसाठी खोदकाम केल्यामुळे 50 मीटर लांबीचा व तीन मीटर रुंदीचा रस्ता कोसळला आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकाला खचलेला भूभाग भरण्यास व त्या ठिकाणी सुरक्षारक्षक ठेवण्याची सूचना केली आहे, असे महापालिकेचे सहशहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे यांनी सांगितले.
हेही वाचा