हुश्श..! परीक्षा संपल्या, आता प्रतीक्षा निकालाची File Photo
पुणे

हुश्श..! परीक्षा संपल्या, आता प्रतीक्षा निकालाची

विद्यार्थी, पालकांना ऐन उन्हाळ्यात झाला मनस्ताप

पुढारी वृत्तसेवा

बारामती: राज्यातील सर्व शाळांच्या वार्षकि परीक्षा शुक्रवारी (दि. 25) संपल्या. यंदा या परीक्षा एकाचवेळी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाचा चटका अधिक असतानाही शिक्षण विभागाने अखेरपर्यंत आपल्या निर्णयात बदल केला नाही. परिणामी विद्यार्थी व पालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. पुढील शैक्षणिक वर्षात तरी शिक्षण विभागाने उन्हाळा लक्षात घेत नियोजन करावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

दरवर्षी शैक्षणिक वर्षातील 220 दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणे आवश्यक आहे. त्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान 800 तास, तर इयत्ता सहावीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचे एक हजार तास अध्यापन बंधनकारक आहे.

त्यानुसार अध्यापनाच्या तासांचे नियोजन अपेक्षित असते. या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यातून सुरू झालेली अंतिम सत्र परीक्षा 25 एप्रिलपर्यंत चालू राहिली.

या वेळापत्रकावर पालक व शिक्षकांनी आक्षेप घेतला. विविध शिक्षक संघटनांनी यात दुरुस्ती व्हावी, अशीही मागणी केली. परंतु, शिक्षण विभाग आपल्या निर्णयावर ठाम राहिले. परिणामी 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असताना विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना ने-आण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अनेक शाळांमध्ये अद्याप विजेची सुविधा नाही. वीज नसल्याने पंख्याचा विषय मात्र दूरच राहिला. जेथे वीज, पंखे उपलब्ध आहेत, तेथे भारनियमन सुरू होते. परिणामी प्रचंड उकाड्याचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला.

दरवर्षी प्राथमिक, माध्यमिक शाळा परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये होत असतात. 15 एप्रिलपर्यंत परीक्षांचे कामकाज पूर्ण होऊन पुढील पंधरवड्यात वार्षकि निकालपत्रिक तयार करून 1 मेला निकाल जाहीर केला जातो. मात्र, यंदाचे वेळापत्रक गैरसोयीचे ठरले.

पाच दिवसांची कसोटी

वार्षकि परीक्षांचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 मे रोजीच जाहीर होणार आहे. यंदा परीक्षा उशिराने घेण्यात आल्या. त्यामुळे वार्षकि परिक्षेनंतरची पेपर तपासणी, फेरतपासणी, संकलित मूल्यमापन नोंदवही पूर्ण करणे, निकालपत्रकांना मंजुरी घेणे, निकालपत्रक तयार करणे यासाठी शिक्षकांच्या हातात अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. या पाच दिवसांत हे काम पूर्ण करण्याची कसोटी शिक्षकांपुढे असेल. जास्त विद्यार्थीसंख्या असणार्‍या शाळांच्या शिक्षकांची यामुळे तारांबळ उडणार आहे.

16 जूनला नवीन शैक्षणिक वर्ष

विद्यार्थ्यांना 26 एप्रिलपासून सुटी लागेल. शिक्षकांना मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शाळेत यावे लागेल. 15 जूनला रविवार असल्याने पुढील शैक्षणिक वर्ष 16 जूनपासून सुरू होईल. पुरेशी पटसंख्या नसल्याने अतिरिक्त होण्याची टांगती तलवार शिक्षकांपुढे असते. परिणामी उन्हाळी सुटीत शिक्षकांना पटसंख्या टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT