पुणे/येरवडा; पुढारी वृत्तसेवा: जमिनीच्या वादातून एका माजी सैनिकाने पिस्तूलातून गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
11 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास लोहगाव परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी किशोर विश्वासराव पाटील (वय 41, रा. पोरवाल रोड, लोहगाव) या माजी सैनिकावर गुन्हा दाखल केला आहे, याबाबत पोलिस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
पाटील यांची लोहगाव परिसरात जागा आहे. काही व्यक्ती त्यांच्या जागेवर बोर्ड लावत होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर पाटील तेथे गेले. त्यावेळी पाटील व तेथे आलेल्या लोकांत वाद झाला. त्यातूनच पाटील याने हवेत गोळीबार केला. त्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पाटील यांच्याकडे शस्त्र परवान्याबाबत चौकशी केली असता, पाटील यांना जिल्हाधिकारी दोडा जम्मू-काश्मीर यांनी शस्त्र परवाना मंजूर केला आहे. मात्र, त्याची मुदत 2017 मध्ये संपलेली असताना, त्याचे नूतनीकरण करून घेतलेले नाही. तसेच े शहर पोलिस आयुक्तालयाकडे नोंदणी करणे गरजेचे असताना ती केलेली नसल्याचे आढळून आले.