पुणे: महापालिकेतील घोटाळेबाज उपायुक्त माधव जगताप यांचे कारनामे गंभीर असतांना देखील त्यांच्यावर सौम्य कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण विभागात असतांना तेथे मोठा गैरकारभार केल्यावर जगताप यांना मिळकत कर विभागप्रमुख करत पालिका आयुक्तांनी त्यांना मोठी भेट दिली.
त्यांचे घोटाळे माहिती असून सुद्धा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी जुजबी कारवाई करत त्यांना अभय दिल्याचा आरोप करत भाजपचे प्रवक्ते अॅड. मधुकर मुसळे आणि माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांनी आयुक्त भोसले यांचा निषेध केला.
विविध घोटाळ्यात उपायुक्त माधव जगताप यांचे नाव समोर आल्याने पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी जगताप यांच्या दोन वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे. जगताप हे अतिक्रमण विभागाचे प्रमुख असतांना औंध येथील परिहार चौकातील शिवदत्त मिनी मार्केट प्रकरणात त्यांनी मोठा गैरकारभार केला.
या घोटाळ्याची माहिती देतांना मुसळे म्हणाले, या प्रकरणात जगताप यांनी चक्क आयुक्तांच्या नावे खोटे पत्र लिहून अनेक गैरप्रकार केले. या घोटाळ्यात उपायुक्त जगताप यांच्यासह विभागातील इतर अधिकारीही सहभागी आहेत. त्यामुळे यात सामील असणार्या अधिकार्यांवर देखील कारवाई करायला हवी.
बेकायदेशीर परवाना देणे, बायोमॅट्रीक सर्वे करून घेणे, आपल्या अधिकाराचा गैरवापर करणे, अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कनिष्ठ अधिकार्यांना तोंडी व लेखी आदेश देत थेट जगताप यांनी आयुक्तांनाच चेकमेट केले असून त्यांची मोठी दिशाभूल केल्याचा आरोप मुसळे यांनी केला आहे.
जगताप यांचे सर्व कारभार माहिती असून सुद्धा आयुक्तांनी त्यांच्या गैरकारभाराला प्राधान्य दिले. जगताप यांनी विविध खात्यातील अधिकार्यांना धमकावून शिवदत्त मिनी मार्केटचे पुर्नवसन करण्याचा प्रयत्न केला.
जगताप यांनी येथील 30 स्टॉल धारकांकडून प्रत्येकी 4 लाख घेतल्याचा आरोप मुसळे यांनी केला असून जगताप यांनी अनेक गुन्हे केल्याने आयुक्तांनी त्यांना मिळकत कर विभागाची जबाबदारी दिली. त्यामुळे आयुक्तांच्या भूमिकेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा आरोप मुसळे यांनी केला आहे.
दरम्यान, जगताप यांनी मिळकत कर विभागात देखील मोठा घोटाळा केला. जगताप यांची चौकशी झाल्यावर त्यांची पालिकेतून तातडीने हकालकापट्टी करणे अपेक्षित असतांना, त्यांच्या केवळ दोन वेतनवाढ रोखत आयुक्तांनी जुजबी कारवाई केल्याचा आरोप मुसळे यांनी केला आहे.
न्यायालयात या प्रकरणी दाद मागणार
जगताप यांनी केलेले सर्व प्रकार गंभीर असूनही आयुक्त भोसले यांनी जगताप यांच्यावर जुजबी कारवाई केली आहे. इतर कोणी साधी चूक केली तर संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते. मात्र, जगताप यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी. आयुक्त भोसले यांनी किरकोळ स्वरुपाची कारवाई केल्याने आयुक्तांचा निषेध करतो. तसेच या प्रकरणी जगताप यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या साठी नगर विकास विभाग, न्यायालयात दाद मागू असा इशारा मुसळे यांनी दिला आहे.