पुणे

पिंपरी : ‘ईव्हीएम’ स्ट्राँग रूममध्ये कुलूपबंद

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशिन थेरगाव येथील स्ट्राँग रूममध्ये जमा करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्ट्राँग रूम कुलूपबंद करण्यात आले. ते कुलूप आता गुरूवारी (दि.2) उघडले जाणर आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदार संघातील विविध 510 मतदान केंद्रांवर मतदानांची प्रक्रिया पार पडली. सायंकाळी सहानंतरही काही केंद्रांवर मतदान सुरू होते. उपस्थित मतदारांना मतदान करू दिल्यानंतर ईव्हीएम मशिन पोलिंग एजंटच्या उपस्थितीमध्ये सील करण्यात आल्या.

पोलिस बंदोबस्तात ईव्हीएम व इतर साहित्य घेऊन मतदान अध्यक्ष व कर्मचारी पीएमपीएल बसने थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे रात्री आठेआठ पासून येण्यास सुरूवात झाली. एका टेबलवर 15 केंद्रांचे साहित्य जमा करून घेण्यात आले. सील केलेल्या ईव्हीएम व इतर साहित्यांची तपासणी करण्यात आली. मशिन दिलेलेच आहे का, त्यात काही बदल केला आहे का, क्रमांक तोच आहे का, याची बारकाईने पाहणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएमसह इतर आवश्यक साहित्य जमा करून घेण्यात आले. तसेच, खराब झालेले मशिनही सील करण्यात आल्या आहेत.

लगोलग ईव्हीएम मशिन कामगार भवनाच्या तळमजल्यावरील स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात आले. त्यापूर्वी व्हीव्हीपॅटची बॅटरी काढली जाते. ईव्हीएम मशिन बॅटरीसह ठेवल्या जातात. सर्व 510 ईव्हीएम मशिन जमा झाल्यानंतर स्ट्रॉग रूम कुलुपबंद करण्यात आले. रात्री अकरानंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर तेथील अधिकारी व कर्मचारी निर्धास्त झाले.

स्ट्रॉग रूमच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिसरात प्रवेशाला प्रतिबंध करण्यात आला आहे. मतमोजणी गुरूवारी (दि.2) केली जाणार आहे. त्यासाठी सकाळी आठला स्ट्रॉग रूमचे कुलूप उघडण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस स्ट्रॉग रूम कुलूपबंद असणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT