पुणे

पुणे : चित्रपट प्रक्रियेत सर्वजण एका ’पेज’वर आवश्यक ; मराठी चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचे मत

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चित्रपटाच्या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक व्यक्ती एकाच 'पेज'वर असणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळा चित्रपट असतो. मात्र, दिग्दर्शकाच्या मनातील चित्रपट कॅमेर्‍यात उतरायला टीममधील प्रत्येकाची मदत आवश्यक आहे आणि म्हणूनच दिग्दर्शकाचे प्रभावी लोकव्यवस्थापन व संवाद कौशल्य यासाठी गरजेचे आहे, असे मत मराठी चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी व्यक्त केले. पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजिलेल्या 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी संवाद साधला. 'लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार' या विषयावर त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, महोत्सवाचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते आदी या वेळी उपस्थित होते.

ताम्हाणे म्हणाले की, चित्रपटाच्या संपूर्ण प्रक्रियेत आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी या केवळ लोकव्यवस्थापन आणि संवाद यांच्या अभावामुळे होत असल्याचे लक्षात घेत मी नेहमीच प्रभावी लोकव्यवस्थापन आणि संवाद कौशल्य यांवर भर देत काम करत आलो आहे. याबरोबरच पडद्यावरील कलाकारांसोबतच पडद्यामागची प्रत्येक व्यक्तीदेखील महत्त्वाची असते हे मला उमगले. चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत वेगवेगळ्या स्वभावाचे अनेक जण सहभागी असतात. त्या प्रत्येकाच्या स्वभावानुसार दिग्दर्शकाला त्यांना सांभाळून घ्यावे लागते शिवाय दिग्दर्शकाच्या अंतर्मनातील भावना आणि निर्णयांकडेदेखील दिग्दर्शकाने कानाडोळा करता कामा नये. या सर्व गोष्टी मला माझ्या आजवरच्या प्रवासात उपयुक्त ठरल्या आहेत. तुमच्या अंतर्मनाच आवाज ऐकत, स्वत:वर विश्वास ठेवत चालत राहा. अनेकदा अनेक लोक तुमचा मार्ग अडवतील, तुम्ही चुकीचे आहात हे सांगतील, अनेक संकटे येतील पण स्वत:वर विश्वास ठेवत पुढे जाणे हे महत्त्वाचे आहे, हे कायम लक्षात ठेवा, असा सल्लाही ताम्हाणे यांनी उपस्थितांना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT