पुणे

उन्हाळ्यातही जलतरण तलाव ‘लॉक’च; सांगवीच्या तलावाची तीन वर्षांपासून दुरुस्ती सुरूच

अमृता चौगुले

नवी सांगवी : जुनी सांगवी येथील बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव मागील तीन वर्षांपासून बंद आहे. आधी लॉकडाऊन होता, नंतर दुरुस्ती व सध्या सुशोभीकरणाची कामे सुरू असल्यामुळे उन्हाळ्यात पोहण्यासाठी सांगवी व परिसरातील नागरिकांना पिंपळे गुरव, बोपोडी, कासारवाडी या ठिकाणी जावे लागत आहे.

नागरिकांचा हिरमोड
सध्या उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. तसेच शाळा, महाविद्यालयांना दोन महिने सुटी असल्याने पोहायला जाणार्‍यांची संख्या मोठी असते. सकाळपासून तलावावर गर्दी असते. याच काळात पोहायला शिकायला जाणार्‍यांची संख्या असते. मागील तीन उन्हाळ्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली उखडलेला जलतरण तलाव अजूनही नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत दिवस मोजत असल्याचे चित्र सांगवीकरांना पाहायला मिळत आहे.

उन्हाळ्याची सुटी वाया जाणार
जुनी सांगवी येथील बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव आधी कोरोनामुळे बंद होता आणि आता नूतनीकरणाच्या नावाखाली कासव गतीने त्याची दुरुस्ती चालल्याचे दिसत आहे. गर्मीमुळे हौशी जलतरणपटूंची तलावात पोहायला गर्दी असते. त्यासाठी महापालिकेचा जलतरण तलाव सर्वसामान्यांना एक चांगला पर्याय ठरतो. सांगवी, दापोडी, बोपोडी, औध या भागातून हौशी जलतरणपटू तलावात पोहायला येत असतात.  विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत पोहायला शिकणे हीसुद्धा एक संधी असते. परंतु, सांगवीतील हा बाळासाहेब शितोळे तलाव यंदाच्या हंगामात दुरुस्त होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीत.

महापालिकेच्या उत्पन्नावर 'पाणी'
जलतरण तलाव बंद असल्यामुळे उत्पन्न बुडत आहे. पिंपळे गुरव येथील काळुराम जगताप जलतरण तलावाकडे लोक जात आहेत. तिकडे सर्व बॅच भरलेल्या असतात. या विषयी स्थापत्य विभागाचे अभियंता अब्दुल मोमीन म्हणाले, की जलतरण तलावाचे काम गतीने सुरू आहे. येत्या चार ते पाच महिन्यांत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चाची कामे आहेत.
शहरात महापालिकेचे 13 तरण तलाव आहेत. मात्र, त्यापैकी तब्बल सात बंद आहेत. यासाठीची विविध कारणे प्रशासनाकडून दिली जातात. यातील प्रमुख कारणे म्हणजे गळती, इतर दुरुस्ती, रंगरंगोटी. मात्र, त्यासाठी काळ आणि वेळमर्यादा निश्चित केली नसल्याने तलाव वर्ष-दोन वर्षे बंद राहिले आहेत.

संथ गतीने सुरू असलेली कामे
गळती बंद करणे जुन्या फरशा बदलून नवीन टाकणे
तलाव परिसरात कुस्ती मैदान तयार करणे जॉगिंग ट्रॅक
महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र कपडे बदलण्याची अद्ययावत खोली
फॅब्रिक छत रंगरंगोटी लहान मुलांसाठी तलावाची खोली कमी करणे

दोन वर्षांपासून संथ गतीने कामे सुरू आहे. ते गतीने केले असते, तर किमान या हंगामात तरी नागरिकांचा हिरमोड झाला नसता. काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे, ही अपेक्षा आहे.

                                           – संतोष कांबळे, माजी नगरसेवक

लहान मुलांना पोहायला शिकविण्यासाठी इतरत्र ठिकाणी जावे लागते. त्यामुळे वेळ व गर्दी याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर जलतरण तलाव सुरू करावा.
                                      – राजश्री पवार, स्थानिक रहिवासी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT