पुणे

मेट्रोचे काम संपले तरी सिग्नल सुरू होईनात! कल्याणीनगर येथेे कोंडी नित्याचीच

अमृता चौगुले

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर बिशप शाळेजवळील सिग्नल बंद असल्याने या चौकात दररोज सांयकाळी वाहतूक कोंडी होत आहे. हा सिग्नल सुरू करावा, अशी मागणी शिवकर्म प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव गलांडे यांनी केली आहे. वडगाव शेरी, विमाननगरमधील वाहने कल्याणीनगर बिशप शाळा चौकातून कोरेगाव पार्ककडे जातात. तसेच, कोरेगाव पार्क, कल्याणीनगरमधील वाहने या चौकातून नगर रोडकडे जातात. हा मार्ग नगर रोडला पर्यायी मार्ग असल्याने अनेक जण या रस्त्याचा वापर करतात.

मेट्रोच्या कामामुळे कल्याणीनगर बिशप शाळेतील सिग्नल बंद करण्यात आला होता. या चौकातील मेट्रोचे काम संपले, तरी अद्याप सिग्नल सुरू करण्यात आले नाहीत. त्यामुळे वाहन एकमेकांसमोर येऊन वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. बिशप शाळा ते मारिप्लेक्स चौक यादरम्यान वाहनाच्या रांगा लागतात. तसेच, रामवाडी भुयारीपर्यंत वाहनांची रांग लागते.

यामुळे या चौकातील सिग्नल सुरू करावा, अशी मागणी होत आहे. याबाबत गलांडे यांनी सांगितले की, कल्याणीनगर बिशप चौकातील सिग्नल सुरू केल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होणार आहे. सिग्नल नसल्याने नागरिक बिनदिक्कतपणे पुढील वाहनांची तमा न बाळगता वाहने चालवतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वॉर्डनची नेमणूक करण्याची गरज आहे.

SCROLL FOR NEXT