खेड- राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीतील पाणीटंचाई आणि गढूळ पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून संतप्त महिलांनी मंगळवारी (दि २४) नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्मिला शेटे यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या महिलांनी मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांना घेराव घालून दैनंदिन स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी केली. शहरात सध्या दिवसाआड येणारे गढूळ पाणी यामुळे नागरिक त्रस्त आहेत. (Latest Pune News)
याविषयी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारताना महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याला जबाबदार कोण?" असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.मुख्याधिकारी गरकळ यांनी महिलांच्या मागण्या ऐकून घेतल्या असून, पाणीपुरवठा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन दिले. मात्र, महिलांनी ठोस कृती न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.