पौड: भोरचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे स्पष्ट केल्यानंतर भोर विधानसभेत भाजपची ताकद असलेल्या मुळशी तालुक्यात थोपटे यांच्या प्रवेशावर नाराजी व्यक्त करत थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मेलद्वारे पत्र पाठवून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
भाजपचे मुळशी तालुका सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी एक प्रसिद्धिपत्रक काढून थोपटेविरोधातील भाजप कार्यकर्त्यांची खदखद व्यक्त केली आहे. ज्यांच्या विरोधात आम्ही आजपर्यंत काम केलं, प्रचार केला तेच आता आपल्या पक्षात येत आहेत, त्यांचे स्वागत आहे.
परंतु, जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना, व्यथा या सुद्धा नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत. पक्षाच्या हितासाठी माजी आमदार शरद ढमाले यांनी संघर्ष केला. त्यांचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे, असे जाधव यांनी म्हटले आहे. ज्यांचा आयुष्यभर तिरस्कार केला, तेच आपल्या पक्षात येणार याचे विशेष आश्चर्य वाटते. घरी पाहुणे आले की घरातल्यांना बाहेर झोपावे लागते. मुळशीच्या भाजप कार्यकर्त्यांचे आज अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्याकडे कोण लक्ष देणार? आजवर कोणताही बडा नेता या भागाकडे फिरकला नाही वा उभाही राहिला नाही.
कार्यकर्ते पक्षासाठी घरदार वार्यावर सोडतात, नेत्यावर विश्वास टाकून प्रचारात झोकून देतात. परंतु, निकालानंतर तो जिवंत आहे की मेला हे पाहयलाही त्यांना वेळ नसतो. नेत्याच्या पायाशी लुडबूड करणारे पुढे जातात आणि हाडाचा कार्यकर्ता मात्र दुर्लक्षित राहतो तो का, याचे उत्तर वरिष्ठांनी द्यावे, असे जाधव यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, जाधव यांच्या पत्राला बावनकुळे वा चव्हाण यांच्याकडून रात्रीपर्यंत कसलाच प्रतिसाद आला नव्हता.