पुणे

गीताभक्ती अमृत महोत्सवापासून नास्तिकही दूर राहू शकणार नाहीत : श्री श्री रविशंकर

अमृता चौगुले

आळंदी : पुढारी वृत्तसेवा :  तुम्ही संपूर्ण भारतातील संतसमाजाला ज्ञानाच्या धाग्यात बांधले आहे आणि हे संत परमात्मा भगवान श्रीकृष्णच आहेत. त्याबद्दल मी स्वामीजींचे आभार मानतो. तुमचा गीताभक्ती अमृत महोत्सव हा योगायोग नसून एक दैवी योजना आहे. आळंदीच्या पावन भूमीवरील या उत्सवातील भक्तीच्या लाटा इतक्या प्रगल्भ आहेत, की नास्तिकही त्यांच्या प्रभावापासून लांब राहू शकणार नाहीत, असे मत श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. आळंदी येथील गीताभक्ती अमृत महोत्सवात मातृशक्ती परिषद पार पडली, त्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर गोविंद देव गिरीजी महाराज, सुधांशूजी महाराज, राजश्रीजी बिर्ला, साध्वी ऋतंभरा दीदी, चिन्ना जियार स्वामीजी महाराज, सत्यनारायणजी मौर्य बाबा उपस्थित होते. समाजोन्नती आणि सशक्तीकरणासाठी आपले जीवन समर्पित करणार्‍या विविध क्षेत्रांतील 12 आदरणीय महिलांचा या मातृशक्ती परिषदेत सत्कार करण्यात आला.

यामध्ये लताताई भिशीकर, भाग्यलता पाटसकर, प्रमिला माहेश्वरी, इंदुमती काटदरे, लीना मेहेंदळे, विजया गोडबोले, ललिता मालपाणी, लीना रस्तोगी, कल्याणी नामजोशी, सरोजा भाटे, डॉ. मंगला चिंचोरे आणि मंदा गंधे आदींचा सन्मान करण्यात आला. या वेळी गिरीजी महाराज म्हणाले, आज 12 उल्लेखनीय महिलांचा सन्मान करताना त्यांच्या अमूल्य प्रयत्नांची आणि परिश्रमाची आपण दखल घेऊयात. त्यांचे निःस्वार्थ योगदान हे समाजाच्या कल्याणासाठी आणि आपल्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.

SCROLL FOR NEXT