पुणे

दु:खाचा डोंगर कोसळूनही ती हरली नाही..!

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंतरजातीय विवाह केलेल्या महिलेच्या पतीचे अकाली निधन व्हावे आणि अचानक मुलगा अवघ्या वीस वर्षांचा असताना त्यानेही जग सोडून जावे, अशा स्थितीत कोणतीही महिला कोलमडून पडली असती. मात्र, या परिस्थितीवर मात करत हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षक बनत एका महिलेने त्या विद्यार्थ्यांना घडविले. आज ते विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे. जीवनात अखंड संघर्ष करणारी महिला श्रेया (नाव बदलेले) आहे. दु:खाचा डोंगर कोसळूनही ती हरली नाही, उलट संघर्षाला तिने नवा आयाम प्राप्त करून दिला.

श्रेया ही पुण्यात शिक्षणासाठी आली होती. अंतिम वर्षाच्या वर्गात शिकत असताना तिने आंतरजातीय विवाह केला. विवाहानंतर तिला एका मुलगा झाला. मुलगा तीन वर्षाचा असताना तिच्या पतीचा आकस्मिक मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर श्नेयाने जगण्याची आशा सोडली होती. मात्र आपल्या चिमुकल्याकडे पाहत पुन्हा तिने आयुष्य नव्याने जगण्याचे ठरविले. प्रेमविवाहामुळे दोन्ही घरातील तिला विरोध होता. त्यामुळे कोणाकडे मदत मागावी, अशी चिंता श्रेयाला वाटू लागली. आपल्याला कोण मदत करेल , आपल्या मुलाचे काय होणार असा प्रश्न तिला पडला होता. मात्र संकटापुढे खचून न जाता तिने संघर्ष करण्यास सुरुवात केली.

पुण्यात सुरुवातीला तिने अनेक छोटी मोठी कामे केली. त्यानंतर खासगी शाळेत तिने शिक्षिका म्हणून काम केले. काम करताना विविध संकटे आली. मात्र संकटाचा सामना करत तिने 20 वर्षे नोकरी केली. नोकरी करताना विद्यार्थ्यांचे प्रेम तिच्या प्रती वाढू लागले होते. त्यामुळे दुःख तिला कळत नव्हते. हळूहळू काळ बदलत गेला आणि मुलगा मोठा झाला. माझ्याकडे शिकत असलेली मुले आज विविध पदावर कार्यरत आहेत, असे तिने सांगितले.

विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत… मनाला उभारी

अचानक मुलाला फिट येण्याचा त्रास सुरू झाला, त्या वेळी त्याच्यावर अनेक औषधे उपचार केले. त्रास जास्तच वाढू लागला आणि होत्याचे नव्हते झाले. माझ्याकडे एक आसरा होता, तो पण परमेश्वराने हिरावून घेतला. माझा मुलगा वयाच्या 19 वर्षी निधन पावला. त्या वेळी मी पुन्हा कोलमडले. मात्र, संघर्षाची धार कमी होऊ द्यायची नाही ही खूणगाठ मनाशी बांधली होती. म्हणून आज शिक्षण क्षेत्रात काम करताना माझे अनेक विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत. हीच माझ्या मनाला उभारी देणारी घटना असल्याचे श्रेयाने सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT