पुणे

पिंपरी : पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूचा डंख कायम

अमृता चौगुले

दीपेश सुराणा :

पिंपरी : पावसाळा संपल्यानंतरही शहरात डेंग्यू आजाराची साथ कायम आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे 89 बाधित रुग्ण आढळले होते. तर, नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या चार दिवसांमध्येच डेंग्यूचे 14 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी घरोघरी जाऊन कंटेनर सर्वेक्षण करणे, डासोत्त्पत्ती स्थानके नष्ट करणे, औषध फवारणी, धुरीकरण आदी उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आरोग्य विभागाकडून ढिलाई दाखविली जात आहे. त्यामुळे डेंग्यूला अटकाव होण्याची चिन्हे नाहीत.

डेंग्यूचा वाढला कहर
शहरामध्ये जून महिन्यापासून डेंग्यूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. तत्पूर्वी, जानेवारी महिन्यात 2 बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर, फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान संशयित रुग्ण आढळले. मात्र, एकाही बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. जूनपासून डेंग्यूचे रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात अनुक्रमे 17, 37 आणि 36 रुग्ण आढळले. सप्टेंबरमध्ये 98 रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली. तर, ऑक्टोबर महिन्यात 89 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले आहे. तर, नोव्हेंबर महिन्यात 1 ते 4 तारखेदरम्यान 14 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंग्यूचा कहर वाढल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यातच संशयित डेंग्यू आजाराने शुक्रवारी काळेवाडी येथील शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे.

डासांना आळा घालणे गरजेचे
डेंग्यूचा विषाणू प्रामुख्याने एडिस इजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीला डास चावून ते दुसर्‍या व्यक्तींना चावले की निरोगी व्यक्तीला विषाणूचा संसर्ग होतो. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळच्या वेळी साठलेले पाणी रिकामे करणे गरजेचे आहे. फ्रीजच्या खालच्या ट्रेमध्ये साचलेल्या पाण्यात एडिस डासांची मादी अंडी घालते. सध्या पावसाळा नसला तरीही या रोगाचे रुग्ण आढळतच आहेत.

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी घरोघरी जाऊन कंटेनर सर्वेक्षण करणे, डासोत्त्पत्ती स्थानके नष्ट करणे, औषध फवारणी, धुरीकरण आदी कार्यवाही केली जात असल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. प्रत्यक्षात याबाबत आरोग्य विभागाकडून ढिलाई दाखविली जात आहे.

खासगी रुग्णालये, लॅबच्या माहितीबाबत साशंकता
डेंग्यूच्या चाचण्यांसाठी आवश्यक नमुने वायसीएम रुग्णालयात जातात. त्यामुळे डेंग्यू रुग्णांची नेमकी संख्या समजते. त्याशिवाय, 'सारथी'वर डेंग्यू रुग्णांची नोंद करण्याच्या सूचना खासगी रुग्णालये, दवाखाने व प्रयोगशाळा यांना देण्यात आल्या आहेत. डेंग्यू रुग्णांचा अहवाल दरमहा जिल्हा हिवताप कार्यालयाकडे पाठविण्यात येत असल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे. तथापि, खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा त्याविषयी किती जागरूक आहेत, याविषयी साशंकता आहे.

एखाद्या परिसरात डेंग्यू रुग्ण आढळल्यानंतर त्या परिसरात आरोग्य विभागाकडून कंटेनर सर्वेक्षण केले जाते. औषध फवारणी करण्यात येते. तेथून जवळपास एक किलोमीटरचा परिसर तपासण्यात येतो. डासोत्त्पत्ती स्थानके नष्ट केली जातात. डास अळ्या आढळल्यास संबंधित आस्थापना, बांधकाम व्यावसायिक, नागरिक यांना दंड करण्यात येतो. त्याचप्रमाणे, विविध भागांमध्ये नियमित कंटेनर सर्वेक्षण केले जात आहे.
                                  – कांचनकुमार इंदलकर, आरोग्य निरीक्षक, ग क्षेत्रीय कार्यालय.

संशयित डेंग्यूने शिक्षिकेचा मृत्यू
काळेवाडी-साईनाथ कॉलनी येथील शिक्षिका ऋतुजा भोसले (22) यांचा संशयित डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. निगडीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 29 ऑक्टोबर रोजी त्यांना ताप आल्याने सुरुवातीला काळेवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी निगडीतील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ऋतुजा भोसले या वाकड येथील खासगी शाळेमध्ये शिक्षिका होत्या. त्या काळेवाडीतील खासगी शाळेतील वरिष्ठ शिक्षक श्रावणकुमार भोसले यांच्या कन्या होत. महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले की, ऋतुजा भोसले यांचा मृत्यू संशयित डेंग्यू आजाराने झाला आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT