केंद्र सरकारकडून मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. पण, अजूनही केंद्र सरकार मराठीविषयक असलेल्या प्रकल्पांना गती देत नसल्याचे चित्र आहे. प्रसारभारतीने ऑक्टोबर 2020 मध्ये काही प्रादेशिक भाषांचे स्वतंत्र मनोरंजन चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आकाशवाणी मराठी हे स्वतंत्र मनोरंजन चॅनेल सुरू करण्याचाही निर्णय झाला. हे चॅनेल पुणे केंद्रामार्फत चालवले जाईल, असाही निर्णय झाला. पण, आता चार वर्षे उलटूनही हे चॅनेल सुरू करण्याला मुहूर्त मिळालेला नाही. हा विषय अद्याप रखडलेलाच आहे.
काही प्रादेशिक भाषेतील स्वतंत्र आकाशवाणी चॅनेल सुरूही झाली आहेत. परंतु, मराठीला अजूनही वाट पाहावी लागत आहे. आकाशवाणी मराठी हे चॅनेल कधी सुरू होणार? प्रकल्पाला गती मिळणार की नाही? असे प्रश्न आकाशवाणीच्या श्रोत्यांनी उपस्थित केले आहेत.
29 सप्टेंबर 2020 आणि 14 ऑक्टोबर 2020 या दोन्हीही दिवशी प्रसारभारतीने आपल्या रेडिओ प्रसारण धोरणाबाबत बैठका घेतल्या होत्या. त्यात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. प्रसारभारतीकडून या बैठकीतील निर्णयांबाबत पत्रही जारी केले होते. त्यात प्रादेशिक भाषांना चालना देण्यासाठी आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि मराठी या नऊ भाषाकेंद्रित स्वतंत्र असे मनोरंजन चॅनेल सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आकाशवाणी मराठी हे स्वतंत्र चॅनेल पुणे केंद्रामार्फत चालवले जाईल, असेही सांगण्यात आले होते. या निर्णयानुसार काही भाषांवर आधारित चॅनेल सुरूही झाली आहेत. मात्र, अद्यापही आकाशवाणी मराठी चॅनेलचा विषय रखडेलाच आहे.
लवकरात लवकर मराठीचे चॅनेल सुरू करण्यात यावे, अशी मागणी श्रोत्यांकडून होत आहे. याविषयी श्रोत्या दीपा तावरे म्हणाल्या, मी रोज आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकते. मध्यंतरी आकाशवाणी मराठी हे स्वतंत्र मनोरंजन चॅनेल सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण, त्याचे पुढे काहीच झालेले नाही. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आतातरी याला मंजुरी मिळावी, अशी श्रोते म्हणून आमची मागणी आहे. आकाशवाणी मराठी असे स्वतंत्र चॅनेल सुरू झाल्यास मराठी श्रोत्यांना वैविध्यपूर्ण कार्यक्रम ऐकायला मिळतील. मराठीसाठी स्वतंत्र चॅनेल सुरू झाल्याचा आम्हा श्रोत्यांना आनंद होईल.
आकाशवाणी मराठी हे स्वतंत्र चॅनेल सुरू करण्यासाठी लोकप्रतिधिनींनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी श्रोत्यांनी केली आहे.
आकाशवाणी पुणे केंद्र सध्या मध्यम लहरींवर (मीडियम वेव्ह्ज) उपलब्ध आहे. ही जुनी टेक्नॉलॉजी असल्याने ती कालबाह्य झाली आहे. त्यामुळे पुणे केंद्र एफ.एम.वर उपलब्ध करून द्यावे, यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणीही श्रोत्यांकडून होत आहे.
देशातील 25 शहरांत आकाशवाणीचे एफ. एम. रेनबो चॅनेल आहे. पुणे केंद्रातही हे रेनबो चॅनेल सुरू करण्यात यावे, अशी मागणीही श्रोते करत आहेत.