येरवडा : पुढारी वृत्तसेवा : लोहगावचा पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन पाच वर्षे उलटली तरी अद्यापही पिण्यासाठी पाणी मिळत नाही. भरमसाठ पैसे देऊन खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. आपण लोहगाव-वाघोली रस्त्यावरील स. नं. 82, कर्मभूमीनगरमधील रहिवाशांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे. साधारणपणे 2013 पासून लोहगाव ग्रामपंचायत असल्यापासून या भागात रहात असलेल्या नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. 2017 पासून पुणे महापालिकेत या भागाचा समावेश झाल्यानंतर सर्वजण नियमित कर भरत आहेत.
असे असताना या भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. सात हजार लिटरचा खासगी टँकर आठशे रुपये देऊन विकत घ्यावा लागत आहे. महापालिकेकडे पाणीपट्टीचा भरूनसुद्धा पाणी मिळत नाही. 24/7 समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत कर्मभूमीनगरमध्ये सर्व लेनसाठी जलवाहिन्या टाकल्या आहेत. केवळ काही अंतर जलवाहिन्या टाकून त्या मुख्य वाहिनीला जोडून कर्मभूमीनगरमधील सर्व भागाला नियमित पाणी द्यावे. जर का पाणी दिले नाही तर सर्व नागरिकांतर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ज्या भागात पाण्याचा प्रश्न आहे त्या भागाचे सर्व्हेक्षण करण्यात येईल. ज्या भागाला पाणी देणे शक्य आहे, त्या भागाला पाणी देण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे यांनी सांगितले.
किमान जलवाहिन्या जवळ असलेल्या भागालातरी पाणी द्या, अशी मागणी बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे कर्मभूमीनगर परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी कार्यकारी अभियंता रमेश वाघमारे, शाखा अभियंता रवींद्र पाडळे, सुधीर आलूरकर, माजी उपमहापौर नंदू मोझे, कर्मभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहनराव शिंदे, उपाध्यक्ष सुनील खांदवे, इराणा मामीलवाड, चंद्रकांत परदेशी, एम. एम. ठाकूर, डी. एच. सदावर्ते, प्रणव त्रिपाठी, गौतमकुमार, व्ही. सी. पांडा आदी कर्मभूमीनगरमधील नागरिक यावेळी उपस्थित होते.