पुणे

पिंपरी : वर्षभरानंतरही मेट्रो फुगेवाडीपर्यंतच; नागरिकांसह वाहनचालकांत तीव्र नाराजी

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मेट्रो सुरू होऊन एक वर्षे झाले तरी, मेट्रो फुगेवाडीच्या पुढे धावत नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची नाराजी वाढत आहे. संथगतीने मेट्रोचे काम सुरू असल्याने आणि वाहतुक कोंडी काही सुटत नसल्याने नागरिक व वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी ते फुगेवाडी या 5.8 किलोमीटर अंतरावर 6 मार्च 2022 ला मेट्रो सुरू करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यात टप्प्याटप्प्याने मेट्रो फुगेवाडीच्या पुढे सुरू केली जाईल, असे महामेट्रोने व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी जाहीर केले होते.

मात्र, एक वर्षे झाले तरी, पुणे शहराला जोडण्याचे तर दूरच अद्याप मेट्रो फुगेवाडीच्या पुढे दापोडी स्टेशनपर्यंतही सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांकडून मेट्रो प्रवासास पसंती मिळत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांना पूर्वीप्रमाणेच स्वत:चे वाहन किंवा पीएमपीएल बसने पिंपरी-चिंचवड व पुणे असा प्रवास करावा लागत आहे. मेट्रो सुरू होऊन एक वर्षे झाले तरी, अद्याप दापोडी, बोपोडी, खडकी स्टेशन या मेट्रो स्टेशनची कामे सुरूच आहेत. या अर्धवट व सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

विशेषत: बोपोडी व खडकी येथील कामांमुळे वाहनचालक वैतागले आहेत. मेट्रोच्या कामामुळे हा मार्ग एकेरी केल्याने खडकी बाजारातून वळसा मारून पुण्याकडे जावे लागत आहे. अरूंद रस्ता, वाहतुक कोंडी, बेशिस्त वाहनचालक, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आदींमुळे वारंवार वाहतुक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहेत. तसेच, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक वैतागले आहेत.

त्यामुळे या मार्गाला पर्यायी रस्त्यावरून जाण्यास वाहनचालक पसंती देत आहेत. अशी बिकट स्थिती असली तरी, मेट्रोचे काम संथ गतीनेच सुरू आहे. त्यामुळे महामेट्रो प्रशासनावर रोष व्यक्त केला जात आहे. मेट्रोची सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून पिंपरी ते स्वारगेट आणि रामवाडी व वनाज-कोथरूड अशी मेट्रो लवकरत सुरू करावी. तसेच, वाहतुक कोंडीतुन सुटका करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो प्रवासाला प्रतिसाद घटला
महिना प्रवासी उत्पन्न
मार्च 1,43,451 21,23,860
एप्रिल 61,511 9,12,247
मे 58,612 8,59,099
जून 36,802 5,37,321
जुलै 22,947 3,28,387
ऑगस्ट 70,134 7,95,117
सप्टेंबर 22,044 3,14,455
ऑक्टोबर 28,128 4,03,883
नोव्हेंबर 25,280 3,54,507
डिसेंबर 21,478 3,07,984
जानेवारी 21,105 3,05,026
फेब्रुवारी 15,944 2,29,899
एकूण 5,27,466 74,71,790

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT