पुणे: समानपाणीपुरवठा योजनेतील प्रलंबित कामे पुढील दोन महिन्यांत पूर्ण करावीत, महापालिकेच्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवावेत तसेच तलावांतील गाळ काढण्याची कामे महापालिकेच्या यंत्रणेमार्फत प्रभावीपणे करण्यात यावीत, अशा सूचना महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिल्या. शहरातील टँकरपुरवठा सुधारण्यासाठी नवीन टँकर पॉइंटसाठी जागा उपलब्ध करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत महापालिकेच्या आरोग्यसेवांबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शहरातील सहा प्रसूतिगृह, पाच सर्वसाधारण रुग्णालये आणि सहा एनआयसीयू अद्ययावत करण्याची कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच लायगुडे दवाखाना याचे आधुनिकीकरण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
शहरी गरीब योजनेअंतर्गत रुग्णालयांना वेळेत देयके मिळण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उभारावी, तसेच जिल्हा परिषदेकडील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हस्तांतरित न झाल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी डीपीडीसी बैठकीत मांडाव्यात, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टरसह उपचार सुविधा उपलब्ध करून देणे, शहरात स्वतंत्र प्राणी उपचार केंद्र उभारणे आणि पाळीव प्राण्यांसाठी ‘डॉग पार्क’ विकसित करण्याबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. डुकरांच्या नियंत्रणासाठी नियुक्त एजन्सींचे संपर्क क्रमांक सार्वजनिक करण्याचे आदेशही देण्यात आले.
याशिवाय, सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी शववाहिका उपलब्ध करून देणे, सुरक्षारक्षकांची संख्या वाढवून तीन पाळ्यांमध्ये नेमणुका करण्याची पडताळणी करणे तसेच आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाने विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महापौरांनी दिले.