पुणे

धायरीत होणार समान पाणीवाटप; टंचाईग्रस्त रहिवाशांना मेअखेरपर्यंत वितरण

Laxman Dhenge

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील सर्वात अधिक लोकसंख्येच्या धायरी येथील 30 हजारांवर रहिवाशांना अखेर समान पाणीवाटप योजनेंतर्गत पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. योजनेंतर्गत मे अखेरपर्यंत प्रत्यक्ष पाणीवाटप सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन फुटी जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. धायरी येथील हायब्लीस सोसायटीजवळ समान पाणीवाटप योजनेंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. मात्र, अनेक महिन्यांपासून काम मंदगतीने सुरू होते. पाणीटंचाईची समस्या दूर व्हावी यासाठी माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच आमदार भीमराव तापकीर यांनी याबाबत थेट विधिमंडळात शासनाचे लक्ष वेधले होते.

तर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर व नागरिकांनी सिंहगड रोड परिसरातील रखडलेल्या समान पाणीवाटप योजनेचे काम पूर्ण करण्याचे साकडे घातले होते. माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे म्हणाले, आरक्षित जागेवर पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. ही योजना सुरू झाल्याने हजारो नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. समान पाणीवाटप विभागाचे उपविभागीय अभियंता नितीन खुडे म्हणाले, वडगाव जलशुद्धीकरण केंद्र ते धायरी येथील हायब्लिस सोसायटीपर्यंत जलवाहिन्या टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मे पर्यंत काम पूर्ण होईल आणि लगेच पाणीपुरवठा सुरू होणार आहे. सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा ते उंबर्‍या गणपती चौक तसेच पारी कंपनी, हायब्लिस सोसायटी परिसरातील तीस हजारांवर रहिवाशांना या योजनेचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे या परिसरातील पाणीटंचाईची समस्या दूर होणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT