पुणे

पुणे : अधिसभा निवडणुकीत पक्षीय राजकारणाचा शिरकाव

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पक्षीय राजकारण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांनी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलची घोषणा करून पदवीधर गटासाठी दहा जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सोमवारी महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलच्या माध्यमातून विद्यापीठाच्या अधिसभेच्या जागा लढवणार असल्याची घोषणा केली.

20 नोव्हेंबरला होणार्‍या पदवीधर गटातील निवडणुकीसाठी संजय यादव, आकाश झांबरे, बाकेराव बस्ते, सोमनाथ लोहार, नारायण चापके, महेंद्र पठारे, तबस्सुम इनामदार, अजिंक्य पालकर, संदीप शिंदे, विश्वनाथ पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पदवीधरची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी पुणे, नगर आणि नाशिक येथे होणार आहे, तर मतमोजणी 22 नोव्हेंबर रोजी पुणे विद्यापीठात होईल.

दहा उमेदवार रिंगणात…
जगताप म्हणाले, की विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत आतापर्यंत पक्षीय राजकारण नव्हते. मात्र गेल्या पाच वर्षांतील अधिसभेचा भोंगळ कारभार पाहिला. काही लोकांनी विद्यापीठात प्रती कुलगुरू असल्यासारखे दाखवून कारभार केला. या कारभाराला विरोध व्हायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चार असे दहा उमेदवार पदवीधर गटाची निवडणूक लढवतील.

SCROLL FOR NEXT