पुणे : पुढारी प्रतिनिधी : लाचखोरी प्रकरणात अडकलेल्या डॉ. अनिल रामोड याचे प्रकरण दररोज नवी कलाटणी घेत असून, सीबीआयसोबत आता सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) एन्ट्री होण्याची चर्चा रंगली आहे. लवकरच ईडी या प्रकरणात त्यांना चौकशीसाठी बोलावू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पुणे विभागीय आयुक्त रामोड याला सीबीआयने अटक केली असून, तो सध्या येरवडा कारागृहाच्या कोठडीत आहे.
डॉ. रामोड याच्याकडे आयएएस केडरमध्ये आल्यानंतर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्तपदाचा कार्यभार देण्यात आला होता. यात त्याच्याकडे विभागातील महसुली दावे; तर पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील महामार्गांच्या भूसंपादनाची प्रकरणे सुरू होती. याच प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्याच्या हेतूने आर्थिक व्यवहार केले जात असल्याचे बोलले जात होते. अशाच एका प्रकरणात त्याला आठ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडले.
कार्यकाळातील प्रकरणे आणि चर्चा
महामार्गालगतच्या जमिनीची प्रकरणे निकाली काढण्यावर डॉ. रामोड यांनी अधिक लक्ष दिल्याचे तपासात समोर आले. त्यांनी 350 पेक्षा अधिक केवळ निकालासाठी प्रलंबित असली, तरी अनेक प्रकरणे त्यांनी निकाली काढली आहेत. या प्रकरणात मध्यस्थामार्फत मोठे आर्थिक व्यवहीर केले जात असल्याची चर्चा रंगल्याने ईडीची एन्ट्री होऊ शकते, अशी चर्चा प्रशासकीय अधिकार्यांमध्ये रंगली आहे.