डॉ. एन. राजम, संगीता शंकर, रागिणी आणि नंदिनी शंकर यांच्या व्हायोलिन वादनाने स्वरानंद दिला. 
पुणे

पुणे : व्हायोलिनच्या स्वराविष्काराने रसिक मंत्रमुग्ध; तीन पिढ्या एकाच स्वरमंचावर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पहिल्यांदाच सादरीकरण करणार्‍या अविनाश कुमार यांची किराणा घराण्याची सुरेल गायकी….आलम खाँ यांच्या सरोदच्या स्वरलहरींनी जिंकलेली रसिकांची मने…. पंडित साजन मिश्रा आणि स्वरांश मिश्रा या पिता-पुत्राच्या गायकीच्या जुगलबंदीने स्वरमयी झालेली सायंकाळ अन् एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या डॉ. एन. राजम, कन्या संगीता शंकर, नाती रागिणी आणि नंदिनी शंकर यांच्या व्हायोलिनच्या सहवादनाने दिलेला स्वरानंद….अशा सुरेल वातावरणात 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा दुसरा दिवस संस्मरणीय ठरला.

स्वराविष्काराच्या, वादनाच्या आतषबाजीने रसिक आनंदित झाले. तीन पिढ्यांनी एकाच स्वरमंचावर येऊन केलेले व्हायोलिन वादन दुसर्‍या दिवशीचे आकर्षण ठरले. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित 68 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसरा दिवसही सूरमयी ठरला. गायकांच्या सप्तसुरांची उधळण अन् वादकांच्या नादमय वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. किराणा घराण्याचे गायक अविनाश कुमार यांच्या बहारदार गायनाने सुरुवात झाली. त्यांनी पहिल्यांदाच महोत्सवात सादरीकरण केले अन् त्यांच्या गायकीने किराणा घराण्याच्या अस्सल गायकीची अनुभूती दिली. त्यांनी राग पुरीया धनश्रीद्वारे आपल्या सादरीकरणास सुरुवात केली.

त्यामध्ये हळूवार स्वरूपातील विलंबित एकताल बंदिशी त्यानंतर द्रुत तीन तालातील "पायलिया झंकार मोरी" आणि एक तालातील बंदिश सादर केली. संत कबीर यांची रचना असलेल्या "मन मन फूला फूला फिरे जगत में" या भजनाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना अविनाश दिघे (हार्मोनियम) पांडुरंग पवार (तबला), आदर्श शर्मा व प्रणव कुमार ( तानपुरा) यांनी साथ केली.

त्यानंतर मैहर सेनी घराण्याचे सरोदवादक आलम खाँ यांचे सरोदवादन दुसर्‍या दिवशीचे आकर्षण ठरले. त्यांनी आपले वडील ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मैहर सेनी घराण्यातील प्रचलित अशा हिंडोल-हेम या मिश्र रागातील रचना सादर केल्या. सुरुवातीला विलंबित गतमध्ये हळूवारपणे या रागाची उकल करत, त्यानंतर द्रुत गत सादरीकरणाद्वारे रसिकांची मने जिंकली. राग मिश्र पिलूमध्ये रूपक तालातील गत सादर करत त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली. त्यांना सत्यजित तळवलकर त्यांना तबल्यासाठी साथ केली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धातील पहिल्या सत्रात दिवंगत पं. राजन मिश्रा यांचे बंधू तसेच ख्याल शैलीचे गायक पं. साजन मिश्रा व त्यांचे पुत्र स्वरांश मिश्रा यांचे सहगायन झाले. त्यांनी राग यमनमध्ये विलंबित एकतालात "पलकन से …" ही रचना , मध्य लयीत टप ख्याल ही दुर्मिळ रचना त्यांनी सादर केली. "एरी आयी पिया बिन" ही प्रसिद्ध बंदिश, त्यानंतर तराणा सादर केला.

खास रसिकाग्रहास्तव त्यांनी सादर केलेल्या "चलो मन वृंदावन के ओर" या भजनाने आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना अजय जोगळेकर ( हार्मोनियम ), पंडित अरविंद कुमार आझाद (तबला ), विरेश शंकराजे व निषाद व्यास (तानपुरा ) यांनी साथ केली. ख्याल शैलीतील बहारदार गायन आणि व्हायोलीनच्या मधुर सुरांनी मंतरलेली एक अनोखी संध्याकाळ रसिकांनी अनुभवली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महोत्सवाला भेट देत, भारतीय शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेतला. या वेळी त्यांनी पं. साजन मिश्रा व त्यांचे पुत्र स्वरांश मिश्रा यांच्या गायकीचा आनंद घेतला. दुसर्‍या दिवशीच्या शेवटच्या सत्रात ज्येष्ठ व्हायोलिन वादक विदुषी एन. राजम, त्यांच्या कन्या संगीता शंकर आणि नाती रागिणी व नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन झाले. तीन पिढीच्या कलाकारांनी सादर केलेल्या दमदार वादनाला रसिकांनी टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी राग दरबारी कानडाद्वारे आपल्या वादनाची सुरुवात केली.

स्वरमंचावर चार व्हायोलिन वाजत असूनही जणू काही एकच व्हायोलिन वाजत आहे, असा अनुभव श्रोत्यांना आला. त्यांनी "माझे माहेर पंढरी…" हा पंडित भीमसेन जोशी यांनी लोकप्रिय केलेला अभंग व्हायोलिनवर सादर केला. "जो भजे हरी को सदा" या भजनाद्वारे त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना मुकेश जाधव (तबला) , वैदेही अवधानी व दिगंबर जाधव (तानपुरा) यांनी साथ केली.
भीमसेनजींचा आशीर्वाद सतत आमच्या बरोबर

1975 मध्ये पहिल्यांदा मी आणि माझा मोठा भाऊ राजन हे सवाई महोत्सवामध्ये गायलो होतो. त्यानंतर जेवढ्या वेळा येथे आलो तेव्हा माझे मोठे बंधू सोबत होते. त्यांचे जाणे माझ्यासाठी खूप धक्कादायक होते. 57 वर्षे आम्ही एकत्र गात होतो आणि अचानक मी माझा भाऊ, गुरू याला मुकलो. पं. भीमसेन यांना आम्ही गुरुस्थानी मानतो. त्यांचा आशीर्वाद सतत आमच्या बरोबर आहे. आमच्या घराण्याची परंपरा आम्हा दोघा भावांची मुले पुढे नेत आहेत त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, अशी भावना पं. साजन मिश्रा यांनी व्यक्त केली.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सादरीकरण करण्याचा आनंद शब्दातीत आहे. महोत्सवाच्या बहुधा पहिल्या किंवा दुसर्‍या वर्षीच मी वडिलांसह सादरीकरणासाठी आले होते. पं. भीमसेन जोशी यांनी ज्या अगत्याने आमचे स्वागत केले होते, ते आजही लक्षात आहे. प्रारंभी एका लहानशा सभागृहात सुरू झालेला हा महोत्सव आज इतक्या भव्य स्वरूपात पार पडताना पाहून अतिशय आनंद होत आहे. या महोत्सवासारखे जाणकार रसिक अन्यत्र पाहायला मिळणे दुर्मीळ आहे.
                                                               डॉ. एन. राजम,
                                                          ज्येष्ठ व्हायोलिन वादक.

कोरोनानंतर हे माझे पहिलेच सादरीकरण आहे. या ठिकाणी माझी कला सादर करणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. यापुढील काळात भारतात आणखी काही कार्यक्रम सादर करण्यासाठी पुन्हा येण्याची संधी मिळेल, अशी मला खात्री आहे.
                                                          आलम खाँ,
                                                         सरोद वादक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT