पुणे: नागरिकांनी अनेक तक्रारी करूनदेखील योग्य पद्धतीने खड्डा न बुजविल्याने क्षेत्रीय कार्यालयातील दोन अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
शहरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. हे रस्ते महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी दुरुस्त किंवा बुजविले जातात. (Latest Pune News)
कोंढवा खुर्दमधील रस्त्यावर देखील अनेक खड्डे पडले आहेत. हे खड्डे दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, या मार्गावरील वानवडी-रामटेकडी येथील खड्डे योग्य पद्धतीने बुजविले नसल्याने पथ विभागप्रमुख पावसकर यांनी वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या एका उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
8877 खड्डे बुजविल्याचा दावा
पावसाळ्यात पडणारे खड्डे त्वरित बुजविण्यासाठी महानगरपालिकेच्या पथ विभागाकडे मनुष्यबळाची व वाहनांची व्यवस्था आहे. त्यांच्यामार्फत शहरातील रस्त्यांची डागडुजी केली जाते. महापालिकेने 1 एप्रिल ते 21 जुलैपर्यंत शहरातील 8 हजार 877 खड्डे बुजविण्याचा दावा केला आहे. दुरुस्त केलेल्या खड्ड्यांचा एरिया 38 हजार चौ. मीटर असून, पावसाळी कामांतर्गत 1 हजार 16 चेंबर दुरुस्त करून पाणी साठण्याची 297 ठिकाणे दुरुस्त केल्याचा दावा केला आहे.