पुणे: बुधवार पेठ परिसरातील प्रसिद्ध आर. जे. ज्वेलर्स या दुकानातून 4 लाख 74 लाख रुपयांच्या फॉर्मिंग ज्वेलरीची चोरी करणार्या आरोपीला विश्रामबाग पोलिसांनी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून अटक केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी कोणताही सराईत गुन्हेगार नसून, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेला हुशार आणि टॉपर विद्यार्थी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे चोरी केल्याची कबुली दिली आहे.
आरोपीने दुकानाच्या वॉशरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून पावणेपाच लाखांचे फॉर्मिंग दागिने चोरून नेले होते. दुसर्या दिवशी चोरी लक्षात आल्यानंतर दुकानमालकाने त्वरित विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. (Latest Pune News)
पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर यांनी तपास सुरू करून 230 ते 250 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान पोलिसांना आरोपी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील जंगमगुर्जनहल्ली गावात असल्याचे समजले.
विश्रामबाग पोलिसांचे पथक कोलार येथे दाखल झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घरी झडती घेतली. त्याच्याकडून चोरीवेळी वापरलेले सँडल, बॅग, कॉलेज आयडी कार्ड आणि मोबाइल जप्त करण्यात आला. मोबाईलमध्ये दागिन्यांचे फोटो आणि आरोपीच्या हातावरील जखमेचे फोटोही पोलिसांना सापडले. पोलिसांनी सलग चार दिवस ट्रॅप लावून गांधीनगर (कोलार) परिसरात त्याच्यावर लक्ष ठेवले.
अखेर 16 जुलै रोजी त्याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण चोरी केलेला माल हस्तगत केला. आरोपीला 19 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
या यशस्वी कारवाईत पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त संजय बनसोडे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, परिमंडल 1 चे पोलिस उपायुक्त ॠषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर, अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अशिष खरात, राहुल मोरे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.