क्रिकेट खेळताना एका अभियंत्याचा शनिवारी (दि. 28) मृत्यू झाला. घटनेच्या ठिकाणावरून, हद्दीबाबतचा मुद्दा उपस्थित करत रावेत आणि निगडी पोलिसांनी एकमेकांकडे बोट दाखविले. अखेर राजकीय नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यानंतर, तब्बल साडेचार तासांनी पोलिसांनी पंचनामा केला. अभियंता, अभिजित गोवर्धन चौधरी (रा. रूपीनगर, तळवडे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कंपनीतील मित्रांसमवेत शनिवारी ते प्राधिकरणातील मैदानावर क्रिकेट खेळत होते. काही वेळानंतर, सकाळी नऊच्या सुमारास त्यांना चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले. निगडीतील लोकमान्य रुग्णालयात त्यांना तातडीने दाखल केले. उपचारापूर्वीच अभिजीत यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी दहा वाजता निगडी पोलिसांना कळविले.
निगडी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सदरची हद्द ही रावेत पोलिसांची येत असल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्यानुसार रावेत पोलिसांना कळविण्यात आले. रावेत पोलिस घटनास्थळी आले. मात्र, त्यांनी देखील घटनास्थळ आपल्या हद्दीत नसल्याचे सांगत निगडी पोलिसांकडे बोट दाखविले. त्यामुळे नातेवाईक पुन्हा निगडी पोलिसांकडे पंचनाम्यासाठी गेले. त्यावेळी निगडी पोलिसांनी पुन्हा सदरची हद्द रावेतमध्ये येत असल्याचे सांगितले. अखेर नातेवाईकांनी शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ही बाब माजी आमदार विलास लांडे यांच्या कानावर घातली. त्यांनी पोलिस आयुक्त, उपायुक्त यांना याबाबत सांगितले. त्यानंतर रावेत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन फटांगरे हे स्वतः घटनास्थळी गेले. ती हद्द निगडीची असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यामुळे रावेत पोलिसांनी अखेर दुपारी दोन वाजता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवला.