पुणे : अभियंता दाम्पत्यांमध्ये मागील आठ वर्षांपासून सुरू असलेला वाद अखेर घटस्फोटाने संपुष्टात आला. 17 वर्षीय मुलीच्या भवितव्याचा विचार करीत दोघांनीही परस्परसंमतीने वेगळे होण्याचा मार्ग निवडल्याने अठरा वर्षांचा संसार दहा दिवसांत मोडला. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश शाम रुक्मे यांनी घटस्फोटाचा अर्ज मंजूर करीत हा निकाल दिला. निकालानुसार मुलीचा ताबा पत्नीकडे राहणार असल्याने मुलीच्या भवितव्यासाठी बापाने 25 लाख रुपयेही या वेळी दिले.
अमिताभ (वय 49) आणि सौंदर्या (वय 44) (नावे बदलली आहेत) दोघेही अभियंता. त्यांचा विवाह डिसेंबर 2007 मध्ये झाला. या दरम्यान, त्यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. काही वर्षानंतर दोघांत वैचारिक मतभेद होऊ लागले. मतभेद विकोपाला गेल्यानंतर एप्रिल 2017 पासून दोघे विभक्त राहू लागले. अमिताभ तर मध्य प्रदेश येथील इंदौर येथे निघून गेला. मात्र, दोघांत कुरबुर सुरू होती. या वेळी, अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांनी त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर दोघांनीही परस्पर संमतीने विभक्त होण्याची तयारी दाखवित घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे 18 महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्याचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे सुमारे आठ वर्षे वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार, न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दोघांतील वादा मिटला. दोघांतर्फे अॅड. राणी कांबळे-सोनावणे यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांना अॅड. ज्ञानदा कदम यांनी सहकार्य केले.
मतभेदामुळे निर्माण होत असलेल्या वादाचा परिणाम मुलीच्या मनासह तिच्या भवितव्यावर होत असल्याची जाणीव दोघांना समुपदेशनादरम्यान करून देण्यात आली. एकत्र येणे शक्य नसल्याने दोघेही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास तयार झाले. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले असून, मुलीचे भवितव्यही उज्ज्वल आहे.अॅड. राणी कांबळे-सोनावणे, अर्जदारांच्या वकील