बिबवेवाडी: बिबवेवाडी परिसरातील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील पदपथांवर भारत ज्योती ते अप्पर चैत्रबन बसस्थानकादरम्यान व्यावसायिकांचे अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच, इमारतींसमोर अवैध बांधकामे करण्यात आली आहेत. यामुळे पादचार्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहे.
याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.या रस्त्यावरील पदपथांवर अनधिकृत पथारी व्यावसायिक, खाद्यपदार्थ आणि ज्युस विक्रेत्यांसह इतर व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. इमारातीपुढील रस्त्यावर अवैध बांधकामे करण्यात आली आहेत.
यामुळे पादचार्यांना चालण्यासाठी पदपथ उरला नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे. परिणामी त्यांना वाहनांच्या गर्दीतून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणे महापालिका प्रशासनाला दिसत नाहीत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम नियंत्रण विभागांकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेश मोहिते यांनी सांगितले. कोणाच्या वरदहस्तामुळे व्यावसायिक पदपथांवर अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे करीत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूल विभागाच्या अधिकार्यांना रस्त्यावरील अवैध बांधकामांबाबत विचारले असता, त्यांनी हे काम बांधकाम विभागाचे असल्याचे सांगितले. मात्र, पथारी व्यावसायिक, हातगाडी व्यावसायिक, भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबत उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.
महेश सोसायटी चौकात गेल्या वर्षभरापासून ड्रेनेजचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच, पदपथ देखील भाजी आणि फळविक्रते, कलिंगडविक्रेते आणि रसाच्या गुर्हाळांसह पानटपरी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. याबाबत सहायक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मात्र, अतिक्रमण निमूर्लन विभाग आणि बांधकाम नियंत्रण विभागाने अद्यापही कारवाई केली नाही.- राम विलास माहेश्वरी, रहिवासी, महेश सोसायटी
स्वामी विवेकानंद रस्त्यावरील दुकाने आणि इमारतींसमोरील फ्रंट आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमणांवर लवकरच कारवाई केली जाईल.- उमेश सुद्रिक, उपअभियंता, बांधकाम नियंत्रण विभाग, महापालिका