पुणे; पुढारी वृत्तसेवा : कर्मचार्यांच्या वेतनातून पीएफसाठीची रक्कम कपात करूनही पीएफ कार्यालयाकडे जमा न केल्यावरून एका खासगी संस्थेविरोधात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून दाखल केलेल्या तक्रार अर्जानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. राजदीप इन्फो टक्नो प्रा. लि. असे या संस्थेचे नाव असून, माजी कर्मचार्यांनी पीएफ कार्यालयाकडे तक्रार केली होती. संबंधित कंपनीविरोधाची तक्रार प्रॉव्हिडंट फंड अॅक्टअंतर्गत तक्रार पीएफ कार्यालयात नोंदवून घेतली.
त्यानुसार कंपनीच्या कोरेगाव पार्क येथील जागेची तपासणी देखील करण्यात आली. तेथील रेकॉर्ड (कागदपत्रे) जप्त करण्यात आली असून, तपासात संबंधित कंपनीने 28 लाख 28 हजार रुपयांच्या पीएफच्या रकमेचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. कंपनीने कर्मचार्यांच्या पगारातून पीएफची रक्कम कापून घेतली. मात्र, पीएफ कार्यालयाकडे पाठविली नाही, हेही या तपासात उघड झाले. कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक दिलीप पोपटलाल दहिवळ आणि संचालक राजेश मन्नालाल कटारिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विभागाच्या पीएफ कार्यालयातर्फे स्पेशल टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली असून, याद्वारे संबंधित प्रकरणे हाताळण्यात येणार आहेत.