पुणेः शहरातील एरंडवणा येथील प्रसिद्ध ‘सिंहगड बिझनेस स्कूल’ या संस्थेत नोकरीस असलेल्या एका ‘इलेक्ट्रीशियन’ने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, गेल्या अकरा महिन्यांपासून पगार न झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मनोज भाऊ भगत (वय 37, रा. जयभवानीनगर, कोथरूड) असे त्याचे नाव आहे. जयभवानीनगर कोथरूड येथे मंगळवारी (दि.27) दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी, कोथरूड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाकडून गेली अकरा महिने मनोज भगत यांना पगार मिळाला नव्हता. आर्थिक अडचणी वाढल्यामुळे ते नैराश्यग्रस्त होते. मंगळवारी (27 मे) दुपारी त्यांनी महाविद्यालयाच्या महिला क्लार्कला व्हिडिओ कॉल केला. ‘माझा पगार होत नसल्याने मी आत्महत्या करत आहे,’ असे सांगून गळफास घेतला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ पतीत पावन संघटनेच्या पदाधिकारी तसेच कर्मचार्यांनी एरंडवणे येथील सिंहगड बिझनेस स्कूल या महाविद्यालयाच्या आवारात गुरुवारी (29 मे) निदर्शने केली. भगत यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्या पदाधिकार्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच संस्थेवर प्रशासक नेमावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.