पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आपल्याकडे असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा कशा पद्धतीने कमी करता येतील, यासाठी विविध शक्कल लढविताना नागरिक दिसत आहेत. त्यासाठी सध्या मॉल्स, किराणा दुकानदार यांच्याकडून साहित्य खरेदी करताना या नोटांचा वापर होत आहे. त्याचप्रमाणे, काही जण या नोटा देऊन सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. हॉटेलमध्ये मात्र, 80 ते 85 टक्के व्यवहार ऑनलाइन होत असल्याने तेथे 2 हजार रुपयांच्या नोटा येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना एका़ वेळी 20 हजारपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेतून बदलून मिळणार आहे. नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. येत्या मंगळवारपासून (दि. 23) बँकांमध्ये या नोटा बदलण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. मात्र, बँकेत जाऊन या नोटा बदलण्याची गरज पडू नये यासाठी आपल्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा कमी करण्यासाठी नागरिक विविध पर्यायांचा वापर करताना दिसत आहेत.
विकेंडची खरेदी रविवारची (दि. 21) सुट्टी साधून अनेकांनी मॉल्स, मोठे किराणा दुकानदार यांच्याकडून आवश्यक साहित्य खरेदी केली. त्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर होताना दिसला. त्याचप्रमाणे, काही जणांनी घरासाठी आवश्यक फर्निचर खरेदीसाठीदेखील दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर करताना आढळून येत होते.
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या नोटा संपविण्यासाठी नागरिक सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याकडे भर देऊ लागले आहेत. मात्र, काही सराफ व्यावसायिक एका वेळी ग्राहकांकडून 2 हजार रुपयांच्या जास्तीत जास्त दहाच नोटा घेत आहेत. सध्या 1 तोळा (10 ग्रॅम) सोन्याचा भाव 61 हजार रुपये इतका आहे. नागरिकांकडून सोन्याचे दागिने, बिस्कीट यामधील खरेदी वाढली असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.
हॉटेलमध्ये येणार्या़ नागरिकांकडून करण्यात येणार्या व्यवहारामध्ये 80 ते 85 टक्के व्यवहार हे ऑनलाइन होत आहेत. केवळ 15 ते 20 टक्केच व्यवहार रोखीने होत आहेत. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा त्यासाठी देण्याचे प्रमाणदेखील खूपच अत्यल्प आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभन शेट्टी यांनी दिली.