पुणे

पिंपरी : आयटी कंपन्यांमध्ये हायब्रिड मॉडेलवर भर

अमृता चौगुले

दीपेश सुराणा :

पिंपरी : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कंपन्यांमध्ये सध्या हायब्रिड मॉडेलवर काम करण्यासाठी कर्मचार्‍यांकडे आग्रह केला जात आहे. त्यामध्ये 3 दिवस कार्यालयातून तर, 2 दिवस घरून काम असे स्वरूप आहे. आयटी क्षेत्रात सतत नोकरी बदलण्याचे प्रमाण वाढल्याने नव्याने आयटी अभियंता झालेल्या फ्रेशर्स कामावर रूजू करून घेताना किमान एक ते तीन वर्षांचा करार करून घेतला जात आहे. कोरोनाच्या कालावधीत आयटी कंपन्यांनी कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला होता. हा पर्याय कर्मचार्‍यांच्या सध्या बराच अंगवळणी पडला आहे. मात्र, कोरोनाचे सावट सरल्यानंतर कंपन्यांकडून कर्मचार्‍यांना कार्यालयात येऊन काम करण्यासाठी सांगण्यात येऊ लागले.

मोठ्या कंपन्यांमध्ये कार्यालयातील कामाची गरज

मोठ्या आयटी कंपन्यांना मिळणार्‍या कामासाठी निश्चित केलेली कालमर्यादा पाळावी लागते. तसेच, कामाची गुणवत्ता सांभाळावी लागते. त्यामुळे या कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांना कार्यालयात बोलावून काम करून घेण्यावर भर दिला आहे. त्यातही कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी त्यांनी कार्यालयात तीन दिवस काम करावे तर, घरून दोन दिवस काम करावे, अशा हायब्रिड मॉडेलचा पर्याय देण्यात आला आहे. त्याला सर्वांधिक प्राधान्य दिले जात आहे. मात्र, छोट्या कंपन्यांमध्ये काही कर्मचार्‍यांना पाच दिवसांच्या आठवड्यातील सर्व दिवस वर्क फ्रॉम होम काम करण्याचीदेखील मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्याचे प्रमाण सध्या कमी झाले आहे.

नोकर्‍या बदलताय तर बॉण्ड करा

आयटी कंपन्यांमध्ये पगारवाढ करून घेण्यासाठी सतत नोकर्‍या बदलण्याचा ट्रेंड रुजला आहे. त्यावर कंपन्यांनी उपाय शोधत नव्याने नोकरी करीत असलेल्या आयटी अभियंत्यांसमवेत (फ्रेशर्स) किमान एक ते तीन वर्षांचा करार करून घेत आहेत. या करारनाम्यात अभियंत्यांना नोकरी सोडण्यापूर्वी एक ते तीन महिन्यांचा नोटीस पीरियड द्यावा लागतो. त्यानंतरच त्यांना नोकरी सोडता येते. त्यामुळे एकप्रकारे किमान एक ते तीन वर्षांसाठी कर्मचार्‍यांची ठराविक एका कंपनीशी बांधिलकी तयार होत आहे.

बॅकग्राउंड व्हेरिफिकेशनला महत्त्व

मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये आयटीयन्सची भरती करताना त्यांचे बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन केले जात आहे. आयटी कर्मचारी आधी कोठे काम करत होते, त्यांच्या कामाचे स्वरुप काय होते ? याची माहिती घेतली जाते. त्याच्या आधारावर कर्मचार्‍याला कामावर घ्यायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येतो.

अयोग्य व्हेरिफिकेशनचा फटका

अनेक आयटीयन्सचे बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन योग्य पद्धतीने न झाल्याने त्याचा त्यांना फटका बसत आहे. हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी खासगी संस्थांचा वापर केला जातो. भरती करताना कर्मचार्‍यांची यादी संबंधित संस्थेला दिली जाते. संस्था यातील कर्मचार्‍यांचे वर्क प्रोफाइल तपासून त्याचा अहवाल कंपनीकडे सादर करते.

आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सध्या मनुष्यबळ कपात झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मूनलाईटिंगच्या (एकावेळी दोन कामे) कारणावरून कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखविण्याचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने वर्क फ्रॉम होमची मागणी केली. पगारवाढीची अपेक्षा व्यक्त केली, अशा विविध कारणांनीदेखील आयटीयन्सना नोकरीवरुन काढण्यात येत आहे.
                                                                      – एक आयटी अभियंता

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT