Schedule of direct admission process for second year of 'Krishi' announced
तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उतीर्ण विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. Exam file photo
पुणे

Pune News| अकरावी प्रवेश प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात, विद्यार्थ्यांची पसंतीक्रम नोंदणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत पहिल्या फेरीतून २५ हजार ३७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

आता दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. तसेच त्यांच्याकडून पसंतीक्रम नोंदवून घेतले जात आहेत. या विद्यार्थ्यांना ३ ते ६ जुलैपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.

त्यानंतर १० जुलै रोजी संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेशयादी कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर प्रसिद्ध केली जाणार आहे. आत्तापर्यंत कॅप फेरीतील २० हजार ५६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, इनहाउस कोट्यातून २ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर व्यवस्थापन कोट्यातून केवळ १७७ इतक्या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविला आहे.

अल्पसंख्याक कोट्यातून १ हजार ७३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकूण ९३ हजार ८१७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी ६६ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यातील कला शाखेसाठी १४ हजार ७७८ जागांसाठी केवळ ५ हजार १९७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

वाणिज्य शाखेच्या ३६ हजार ७२६ जागांसाठी २३ हजार २५१ विद्यार्थ्यांनी, तर विज्ञान शाखेकरिता सर्वाधिक म्हणजेच ३९ हजार २६५ जागांसाठी ३७ हजार ९२१ तर एचएसव्हीसी या अभ्यासक्रमाच्या ३ हजार ४८ जागांसाठी केवळ ५६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

दरम्यान, ३ जुलैला सकाळी १० वाजल्यापासून ते ६ जुलै रात्री १० वाजेपर्यंत नवीन विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करून वैयक्तिक माहिती असणाऱ्या अर्जाचा भाग-१ भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात. तसेच महाविद्यालय पसंतीक्रम असणाऱ्या अर्जाचा भाग-२ विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.

याशिवाय या प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीपासूनच समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंतीक्रम बदलता येतील; अन्यथा मागील फेरीचे पसंतीक्रम कायम राहणार आहेत. दुसऱ्या प्रवेशयादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १० जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

SCROLL FOR NEXT