पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागांत चार घरफोड्या करून चोरट्यांनी रोकड, सोने-चांदीचे दागिने, असा 11 लाख 18 हजार रुपयांचा किमती ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनीत सुमित कुलकर्णी (वय 39) यांच्या सदनिकेचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, असा 5 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. ही घटना 6 ते 19 जुलै या कालावधीत घडली.
कुलकर्णी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादींची सदनिका बंद असताना चोरट्यांनी कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील ऐवज चोरी करून पोबारा केला. दुसर्या घटनेत शंकरशेठ रोड येथील विद्याअमृत सोसायटीत शेठना (वय 38) यांच्या सदनिकेत डल्ला मारून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड आणि लॅपटॉप, असा 2 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. शेठना यांनी याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 17 ते 20 जुलै या कालावधीत घडली आहे. आंबेगाव पठारमधील भिंताडेनगर येथील विघ्नहर्ता रेसिडेन्सीमधील सदनिकेतून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाईल, इलेक्ट्रीक घड्याळ, ऍलेक्स स्पिकर, इस्त्री, मोबाईल चार्जर, असा 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.
याप्रकरणी डॉ. विश्वजित पाटील यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 17 ते 18 जुलै या कालावधीत घडली आहे. सोमजी चौक कोंढवा येथील एसेन्शीया फेज दोनमध्ये अब्दुल पुरी यांच्या सदनिकेतून चोरट्यांनी रोकड, सोन्याचे दागिने, तीन घड्याळे असा 1 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी पुरी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादींच्या सदनिकेचे लॅच लॉक तोडून चोरट्यांनी ही चोरी केली आहे.
हेही वाचा :