पुणे

पिंपरी : समाविष्ट गावांतील वीजग्राहकांना‘बाप्पा पावले’

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : भोसरी विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट गावांसह औद्योगिक पट्ट्यातील वीजसमस्या आता निकालात निघाली आहे. महावितरण प्रशासनाकडून आकुर्डी व भोसरी उपविभागाचे विभाजन भोसरी-1 आणि भोसरी- 2 असे करण्यात येणार आहे. तसेच, तीन नवीन शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघातील वीजसमस्या सोडवण्यासाठी वीजग्राहकांना ऐन गणेशोत्सवात 'गणपती बाप्पा पावला' आहे.

महावितरण संदर्भातील प्रस्तावित वीजविषयक कामांसाठी व निधी मिळणेबाबत आ. महेश लांडगे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्याला आता यश मिळाले आहे. महावितरणच्या भोसरी विभागांतर्गत औद्योगिक व घरगुती असे सुमारे 3 लाख 70 हजार वीजग्राहक आहेत. ग्राहकसंख्या जास्त असल्यामुळे वीजसमस्या आणि तांत्रिक अडचणींच्या तक्रारी वाढल्या आहेत.

भौगोलिक कार्यक्षेत्र आणि वीज मागणी याचा विचार करता भोसरीगाव व आकुर्डी विभागाचा काही भाग असे विभाजन करून नव्या उपविभागाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, स्पाईन सिटी, इंद्रायणीनगर आणि चिखली शाखा कार्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरण कंपनीत अतिरिक्त कर्मचारीवर्ग मिळेल. त्यामुळे ग्राहकसेवा सुधारणार आहे. चिखली गाव परिसरात सुमारे 29 हजार वीजग्राहक आहेत. नवीन शाखा कार्यालयामुळे या ठिकाणी अतिरिक्त 16 कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नवीन विकसित भागातील वीजपुरवठा सक्षम होईल.

भोसरी विधानसभा मतदारसंघात औद्योगिकरण आणि नागरीकरण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. त्यामुळे प्रशासन आणि वीज वितरण व्यवस्थेवर ताण येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात इन्फ्रा-1 आणि इन्फ्रा-2 कामांसाठी पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडचा उल्लेख "फ्युचर मेगासिटी" असा करीत सभागृहात वीज समस्या सोडवण्याबाबत पायाभूत सुविधा सक्षम करण्याची घोषणा केली होती. त्याला आता मूर्त स्वरुप आले आहे.

– महेश लांडगे, आमदार

हेही वाचा

SCROLL FOR NEXT