Elderly woman injured in attack by thieves
आळेफाटा : आळे (ता. जुन्नर) येथे चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून ७२ वर्षीय वृद्ध महिलेस मारहाण करत ४७ हजार रुपये, सोन्याचे दागिने व मोबाईल असा एकूण २ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. चोरट्यांना प्रतिकार करताना या वृद्ध महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना सोमवारी (दि. ५) पहाटे घडली.
शुभदा दिलीप धोंगडे असे जखमी वृद्ध महिलेचे नाव असून याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, आळे गावठाण परिसरात मुंजोबा मंदिरासमोर दुकानात राहणाऱ्या शुभदा दिलीप धोंगडे यांचे दुकानाचे शटर्स अज्ञात चोरट्याने वर करून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर हातातील धारदार शास्त्राचा धाक दाखवत त्यांच्या कपाटातील ४७ हजार रुपये व त्यांचे अंगावरील पावणेदोन तोळ्याचे सोन्याचे मनी मंगळसूत्र व हार असा एक मोबाईल घेऊन असा दीड लाख रूपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. यावेळेस शुभदा धोंगडे यांनी चोरट्यांना प्रतिकार केला या घटनेत त्यांचे डोळ्यास व हाताला मोठी जखम झाली. अशा अवस्थेत त्यांनी आरडाओरड केली. यानंतर त्यांना आळे प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर आळेफाटा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेने आळे गावठाण्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळतात आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. दुपारनंतर ठसे तज्ज्ञांनाही येथे पाचारण करण्यात आले होते. शुभदा धोंगडे यांच्य फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.