पुणे : यंदा प्रशांत महासागरात ‘अल निनो’चा प्रभाव उद्भवणार असून, त्यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सरासरीच्या 90 टक्के पावसाची शक्यता आहे. ‘अल निनो’चा मोठा फटका महाराष्ट्राला आणि विशेषतः या राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या कोअर झोनला बसणार असून, सुमारे 43 टक्के कमी पाऊसमानाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने शुक्रवारी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, याचा प्रभाव थेट सप्टेंबरपर्यंत राहणार असल्याने याचा थेट फटका कृषी उत्पादनांना बसू शकतो.
जून महिन्यात पाऊस कमीच राहणार असल्याचा दुसरा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने वर्तवला. या आधीच्या अंदाजात देशभरात सरासरीच्या 92 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, प्रशांत महासागरात ‘अल निनो’चा प्रभाव वाढत आहे. यामुळे यात सुधारणा करण्यात आली आहे.
शेतकरीवर्गाची चिंता वाढली
महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग हे मान्सून कोअर झोनमध्ये येतात. हाच झोन देशातील आणि राज्यातील बहुतांश कोरडवाहू शेतीचा मुख्य कणा आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या कोअर झोनमध्ये कमी पाऊस पडण्याची 43 टक्के शक्यता आहे.
जून महिन्यात पावसाची ओढ
जून महिन्यात पावसाची तूट राहणार असून, दक्षिण भारत, उत्तर भारताचा काही भाग वगळता सर्वत्र पाऊस उणे राहणार आहे. या कालावधीत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकच्या बहुतांश भागात पाऊस कमी बरसणार आहे. दुसरीकडे, जुलै, ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यातदेखील पाऊस सरासरी गाठण्याची शक्यता कमी असल्याने अवर्षण अटळ मानले जात आहे.
मान्सून खोळंबला
यंदा 16 मे रोजी नैऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल झाले आहेत. साधारणपणे 20 मेच्या आसपास अंदमानात दाखल होणारा मान्सून लवकर पोहोचल्याने तो केरळम्मध्येदेखील लवकर दाखल होण्याचा अंदाज होता. 26 मेपर्यंत तो देवभूमीत आगमन करण्याचा अंदाज असतानाच, त्याने मात्र हुलकावणी दिली आहे. पोषक स्थितीअभावी सध्या मान्सून रेंगाळत असून, सध्या श्रीलंकेचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे.