El Nino | ‘अल निनो’ सक्रिय; दुष्काळाच्या संकटाची चाहूल 
पुणे

El Nino | ‘अल निनो’ सक्रिय; दुष्काळाच्या संकटाची चाहूल

गत ५० वर्षांतील धोकादायक अल निनो; हवामान चक्रात होणार मोठे फेरबदल

पुढारी वृत्तसेवा

पुणे : प्रशांत महासागरात अखेर ‘अल निनो’ सक्रिय झाला आहे. गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक धोकादायक ‘अल निनो’ ठरणार असल्याचा अंदाज भारतातील आणि विदेशी हवामान संस्थांनी व्यक्त केला असून निम्मा भारत दुष्काळाच्या छायेत येऊ शकतो. असे भाकीत वर्तवले आहे. शास्त्रज्ञांनी १८७१ ते २०२२ या १५२ वर्षांतील १६ अल निनो वर्षांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या संकटाची चाहूल लागली आहे. शुक्रवारी सक्रिय झालेल्या अल निनोमुळे जगाच्या हवामान चक्रात मोठे फेरबदल होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

यंदा महाराष्ट्रासह देशा सुमारे साठ टक्‍के पाऊस कमी होऊ शकतो, असा अंदाज अमेरिकेतील एनओएए (नॅशनल ओशिएनिक अँड ॲटमॉस्फिअरिक ॲडमिनिस्ट्रेशन) या संस्थेने दिला आहे, तर दुसऱ्या बाजूला भारतीय हवामान शास्‍त्र विभागाने यंदा पाऊस कमी असला तरी तो ८४ ते ९० टक्‍के पडेल, असा दावा केला आहे. दरम्‍यान, मान्सून मध्य महाराष्ट्रातील सोलापूर-बारामती मार्गावरच गत सात दिवसांपासून अडखळल्याने ऐन जून महिन्यात विदर्भ अन्‌ मराठवाड्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे.

अमेरिकन संस्थेने दिलेल्या अंदाजात भारतात जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत अल निनोचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे ऐन मान्सूनचे महिने कमी पावसाचे राहणार आहेत. सुमारे ६० टक्के कमी पाऊस राहील, तर दुसऱ्या बाजूला भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे की, भारतात ८४ ते ९० टक्के इतका मान्सून राहणार आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा १५ ते २० टक्के कमी राहिल. या दोन्ही संस्थांचे अंदाज कमी पावसाचे आहेत. त्याची प्रचिती जूनचा पहिला आठवडा संपताच येत आहे. १२ जून ओलांडून गेला तरी राज्यात पाऊस नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही धास्तावला आहे.

सरकारच्या सल्ल्याशिवाय पेरणी करू नका : मुख्यमंत्री

राज्य प्रशासनाला संभाव्य कमी पावसासाठी आधीपासूनच तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. एल निनोमुळे पावसात खंड पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कृषी विभागाच्या सल्ल्या‍नेच पेरणी करावी. अन्यथा गंभीर परिस्थती निर्माण होऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

कोयनेची वीजनिर्मिती ठप्प

कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी असून सध्या फक्त ९.३१ टीएमसी पाणी म्हणजे ९.७९ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. कोयना वीज प्रकल्पातील वीजनिर्मितीचा टप्पा ३ व ४ पाण्याअभावी ठप्प झाला आहे.

असे होतील हवामानावर परिणाम

१. काही भागांत अतिवृष्टी व पूर : दक्षिण अमेरिकेतील काही देश आणि अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस आणि पुराचा धोका वाढेल.

२. भीषण दुष्काळ आणि उष्णतेची लाट : ऑस्ट्रेलिया, आशिया खंडातील काही भाग (ज्यात भारताचाही समावेश असू शकतो) आणि आफ्रिकेत मान्सून कमकुवत होऊन भीषण दुष्काळ, पाणीटंचाई आणि जंगलातील वणवे लागण्याचा धोका वाढेल.

३. समुद्री जीवसृष्टीला धोका: महासागराचे तापमान वाढल्याने माशांचे प्रमाण कमी होईल आणि समुद्री जीवसृष्टीच्या अन्नसाखळीला मोठा फटका बसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT