लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चुकीमुळेच शिवसेना फुटली. ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला नसता तर शिवसेना फुटली नसती. खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची राज्य कार्यकारणीची बैठक रविवारी लोणावळ्यात पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा केली. आरपीआयच्या प्रदेशाध्यक्षपदी सोलापूरचे राजाभाऊ सरोदे, कार्याध्यक्षपदी औरंगाबादचे बाबूराव कदम, सरचिटणीसपदी मुंबईचे गौतम सोनवणे यांची तर युवक प्रदेशाध्यक्षपदी पप्पू कागदे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांची पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे आठवले यांनी जाहीर केले.
16 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय चुकीचा
आठवले म्हणाले, की विधानसभेतील 16 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय व विधानसभा उपाध्यक्षांनी काढलेला व्हिप हा बेकायदेशीर व घटनाबाह्य असल्याचे सांगत रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीची स्तुती केली. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळेच त्यांना जबर धक्का बसला अन् तो एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मात्र, एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी हा निर्णय अगोदर दीड वर्षांपूर्वी घ्यायला पाहिजे होता.
आघाडीत मनसेलाही घेऊन करू नका बिघाडी
'भाजप आरपीआयची आहे आघाडी, मनसेलामध्ये घेऊन करू नका बिघाडी' अशी कविता करीत केंद्रीय मंत्री आठवले यांनी भाजपने मनसेला सोबत घेऊ नये, अशी भूमिका मांडली. मनसेच्या परप्रांतीयांच्या संदर्भातील भूमिकेचा राष्ट्रीय पातळीवर नकारात्मक संदेश जात असून भाजपला त्याचे नुकसान होईल. मनसेच्या मराठी माणसाबद्दलच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे, असेही त्यांनी सांगितले.
भाजप, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी युतीचा निर्णय
पक्षाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये आगामी सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषद नगरपालिका व महापालिका निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय आरपीआयने घेतला असून, तसा ठरावही मंजूर करण्यात आला असल्याचे आठवले यांनी सांगितले. आगामी मुंबई महापालिकेवर भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना व आरपीआयचा झेंडा फडकवणार असून, उद्धव ठाकरे यांचे मुंबईवरील वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी आरपीआय भाजप व शिंदे गटाला सहकार्य करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
धनुष्यबाणावर शिंदे गटाचाच अधिकार
या वेळी आठवले यांनी सांगितले की, शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठविण्याच्या भूमिकेला आमचा पाठिंबा नाही. धनुष्यबाण हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असला तरी, शिंदे गटाकडे असलेले सध्याचे राजकीय संख्याबळ व संघटनेतील प्राबल्य पाहता धनुष्यबाणावर शिंदे गटाचाच अधिकार आहे.