आयफोनधारकही वळले पीएमपीकडे; आठ हजार प्रवाशांनी केले App डाऊनलोड File Photo
पुणे

आयफोनधारकही वळले पीएमपीकडे; आठ हजार प्रवाशांनी केले App डाऊनलोड

आठ हजार प्रवाशांनी केले पीएमपीचे नवे आयओएस व्हर्जन डाऊनलोड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पीएमपी गरीब ते सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रवाशांसाठीच आहे, असा समज होता. मात्र, आता तब्बल 8 हजार 500 आयफोनधारकांनी पीएमपीचे अ‍ॅप डाऊनलोड केल्यामुळे, हाय प्रोफाईल लोकही या पीएमपीला जोडण्यास उत्सुक असल्याचे समोर आले आहे.

पीएमपीने अखेर कात टाकत, तंत्रज्ञानाकडे पाऊल टाकले आहे. अ‍ॅपद्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंगसह ऑनलाइन पेमेंट प्रवाशांना करता येत आहे. यासह गुगल पेच्या माध्यमातून देखील प्रवाशांना तिकिटाचे पैसे देता येत आहेत. यामुळे पूर्वी पीएमपीत होणारे सुट्या पैशाचे वाद अखेर कमी होत आहेत. पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते या अ‍ॅपचे उद्घाटन झाले.

या वेळी या अ‍ॅपचे अँड्रॉईड व्हर्जन होते. तेव्हाही प्रवाशांचा या अँड्रॉईड व्हर्जनला चांगला प्रतिसाद मिळाला आणि अजूनही मिळत आहे. मात्र, 26 जानेवारीला पीएमपी प्रशासनाने या अ‍ॅपचे आयफोनला चालणारे आयओएस व्हर्जन सुरू केले. अवघ्या 25 दिवसांत 8 हजार 500 आयफोनधारकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केल्याची नोंद पीएमपी प्रशासनाने केली आहे.

अशी आहे अ‍ॅप डाउनलोडरची स्थिती

अँड्रॉईड डाऊनलोडर - 10 लाख 50 हजार 747

आयओएस व्हर्जन (आयफोनधारक) डाऊनलोडर - 8 हजार 500

एकूण डाऊनलोडर - 10 लाख 59 हजार 247

बनावट अ‍ॅपपासून राहा सावधान

पीएमपीच्या ‘आपली पीएमपीएमएल’ या मोबाईल अ‍ॅपच्या बनावट अ‍ॅपची जाहिरात यू-ट्यूबवरील काही चॅनल्स, टेलिग्राम, फेसबुक, इन्स्टा या समाजमाध्यमांवर काही अपप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून दाखवली जात आहे. याद्वारे पीएमपी प्रवाशांची दिशाभूल व आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे. या मोबाईल अ‍ॅपच्या बनावट जाहिरात करणार्‍या अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सायबर सिक्युरिटी सेल व पीएमपीची तांत्रिक विश्लेषण टीम बनावट अ‍ॅपच्या जाहिरातींवर बारीक लक्ष ठेवत असून, यामध्ये दोषी आढळणार्‍या व्यक्तींवर आय.टी. अ‍ॅक्टनुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मात्र, नागरिकांसह प्रवाशांनी बनावट अ‍ॅपच्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात येत आहे.

पीएमपीने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘आपली पीएमपीएमएल’ अ‍ॅपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपच्या नुकत्याच सुरू केलेले आयओएस व्हर्जनला सुध्दा चांगला प्रतिसाद मिळत असून, त्याचे साडेआठ हजारांच्या घरात डाऊनलोडर आत्ताच्या घडीला झाले आहेत.
दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT