बनावट कागदपत्रांद्वारे आठ हजार कोटींचा जीएसटी चुकविला; मुख्य सूत्रधार अटकेत Pudhari
पुणे

Pune: बनावट कागदपत्रांद्वारे आठ हजार कोटींचा जीएसटी चुकविला; मुख्य सूत्रधार अटकेत

गुजरात, मुंबई, भिवंडी येथील आठ जणांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Pune News: बनावट कंपनीच्या नावे कागदपत्रे सादर करून पाच ते आठ हजार कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चुकविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या पुणे कार्यालयाने ही कारवाई केली असून, कोरेगाव पार्क ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर चुकवेगिरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गुजरातमधील असल्याचे तपासात उघडकीस आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जीएसटी पुणे विभागाच्या कार्यालयातील अधिकारी ऋषी प्रकाश (वय 39) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी अशरफभाई इब्राहिम कालवाडिया, नितीन भागोजी बर्गे, फैजल अब्दुल गफार मेवावाला, निजामुद्दीन मोहम्मद सईद खान, अमित तेजबहाद्दूसिंग, राहुल बटुकभैय्या बरैय्या, कौशिक मकवाना, जितेंद्र गोहेल यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश जीएसटी कार्यालयातील तपास पथकात नियुक्तीस आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये पठाण एंटरप्रायजेस खात्याची ऑनलाइन तपासणी करण्यात आली, तेव्हा पठाण एंटरप्रायजेसकडून कोणत्याही प्रकारची माल खरेदी आणि विक्री होत नसून, केवळ देयके तयार करण्यात आल्याची बाब चौकशीत उघड झाली.

त्यानंतर जीएसटी पथकाने हडपसर भागातील शेवाळवाडी परिसरातील पठाण एंटरप्रायजेसचा शोध घेतला, तेव्हा जीएसटी नोंदणीसाठी दिलेला पत्ता बनावट असल्याचे आढळून आले. संबंधित कंपनी, आस्थापना पठाण शब्बीर खान अन्वर खान याच्या नावावर असल्याचे निदर्शास आले. खान गुजरातमधील भावनगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथक भावनगर परिसरात पोहोचले. तेव्हा पठाण रिक्षाचालक असल्याचे उघडकीस आले. पठाण एंटरप्रायजेसबाबत काहीही माहिती नसल्याचे त्याने सांगितले.

त्यानंतर तपास पथकाने ऑनलाइन तपासणी केली. विश्लेषणात एकाच मोबाइल क्रमांक, ईमेल पत्त्यावर जीएसटी नोंदणीकृत असलेल्या कंपनी, तसेच आस्थापना आढळून आल्या. बँक खात्याचा शोध घेतला तेव्हा खातेधारक जित कुकडीया सुरक्षारक्षक असल्याची माहिती मिळाली. संबंधित खाते कुकडिया याने त्याच्या ओळखीतील आरोपी कौशिक मकवाना आणि जितेंद्र गोहेल यांच्यासाठी उघडल्याची माहिती मिळाली.

जीएसटीच्या तपास पथकाने पुणे, मुंबई, तसेच गुजरातमधील राजकोट, भावनगर परिसरात कारवाई केली. पठाण एंटरप्रायजेस आणि इतर बनावट नावाने अश्रफभाई कालावाडिया चालवित असल्याची माहिती तपासात मिळाली.

पथकाने मीरा भाईंदर परिसरातील एका लॉजमधून कालावाडिया याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 21 मोबाइल, दोन लॅपटॉप, 11 सीमकार्ड, डेबिट कार्ड, धनादेश पुस्तिका, वेगवेगळ्या कंपनीच्या नावे रबरी शिक्के जप्त करण्यात आले. कालावाडियाला अटक करून पुण्यातील शिवाजीनगर न्यायालायत हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोरेगाव पार्क ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला तपास करत आहेत.

246 बनावट कंपन्यांच्या नावे कारभार

जीएसटी कर चुकवेगिरीसाठी आरोपी कालावाडियाने साथीदार नितीन बर्गे, फैजल मेवावाला, अमित सिंग, जितेंद्र गोहेल, कौशिक मकवाना, राहुल बरैय्या आणि साथीदारांनी कट रचला. जीएसटी कर चुकविण्यासाठी त्यांनी बनावट नावाने 246 कंपन्या स्थापन केल्या.

ज्यांना कर चुकवायचा आहे, अशा व्यावसायिकांकडून पैसे घेऊन आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे कर चुकवेगिरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सप्टेंबर 2018 पासून मार्च 2024 पर्यंत आरोपींनी शासनाची पाच ते आठ हजार कोटी रुपयांचा कर चुकविल्याचे जीएसटी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये एका कंपनचीच्या खात्याची चौकशी करत होते. पॅनकार्डवरून पत्ता काढला, तेव्हा ते खोटे असल्याचे दिसून आले. जो व्यक्ती आहे तो व्यक्ती मिळून आला. पण त्याची कंपनी नाही असे समजले. असे परत त्यांची एका व्यक्तीची माहिती मिळाली होती. तो तर सुरक्षारक्षक होता. त्यांना वाटले. त्यांनी मल्टीपल खात्याचे 246 कंपन्याचे बनाटव कागदपत्रे तयार केली. त्यांनी तपासही केला आहे.
- रुणाल मुल्ला, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोरेगाव पार्क पोलिस ठाणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT