पुणे

‘ससून’ची आठ तास झाडाझडती : कर्मचारी, अधिकार्‍यांवर प्रश्नांची सरबत्ती

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बिल्डरपुत्राच्या रक्ताचा नमुना घेताना कोणकोणते कर्मचारी हजर होते? सीएमओ कार्यालयात कोणाची ड्युटी होती? डॉ. अजय तावरेंनी डॉ. श्रीहरी हाळनोरसह आणखी कोणाला फोन केला? रुग्णालयात एवढी गंभीर बाब घडत असल्याची अधिष्ठाता आणि अधीक्षकांना कल्पना होती का? अशा प्रश्नांची सरबत्ती ससूनमध्ये मंगळवारी सुरू होती. वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने तब्बल आठ तास अधिष्ठाता कार्यालयात आठ ते दहाजणांची झाडाझडती घेतली.

कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन बिल्डरपुत्राला रविवारी (दि. 19) ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. सकाळी अकराच्या सुमारास त्याच्या रक्ताचा नमुना घेण्यात आला. अपघातग्रस्त विभागातील वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी नमुना घेतला. त्याचवेळी न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी फोनवरून आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची पिशवी कचर्‍यात फेकून देण्यास सांगितले आणि त्याऐवजी दुसर्‍या रक्ताचा नमुना आरोपीच्या नावाने पुढे पाठवण्यास सांगितले. पोलिस तपासात हा धक्कादायक प्रकार पुढे आल्यावर 26 मे रोजी डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना अटक करण्यात आली.

चौकशी समितीने घेतले जबाब

ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी बिल्डरपुत्राच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये केलेल्या फेरफारप्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे सोमवारी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. डॉ. पल्लवी सापळे, डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी हे समितीतील सदस्य मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास ससून रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर सुरू झालेला चौकशीचा ससेमिरा तब्बल आठ तास सुरू होता. यामध्ये कॅज्युअलिटी विभागातील ड्युटीवर असलेली नर्स, वॉर्ड बॉय, सहायक डॉक्टर, विभागप्रमुख, वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांच्यासह आठजणांची कसून चौकशी केली. यामध्ये लेखी जबाबही नोंदवून घेण्यात आले.

आम्ही शासनाच्या नियमानुसार सर्व माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. चौकशी पूर्ण होण्यास किती वेळ लागेल, ते सांगता येत नाही. पाहणी आणि चौकशी झाल्यावर बैठक होणार आहे. त्यानंतर अंतिम अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.

– डॉ. पल्लवी सापळे, अध्यक्ष, चौकशी समिती

हेही वाचा

SCROLL FOR NEXT