तळेगाव दाभाडे (पुणे) : तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये मागील चार वर्षांत अतिरिक्त पदभार व कायम कार्यभार स्वीकारणारे आठ मुख्याधिकारी झाले आहेत. तर, नवनियुक्त एन. के. पाटील हे नववे मुख्याधिकारी आहेत. त्यामुळे लय भारी तळेगावनगरीला चार वर्षांत होतात आठ मुख्याधिकारी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
इंजिनिअरींग, पॉलिटेक्निक, मेडिकल, बीएड, डीएड, सायन्स, कॉमर्स, आर्टची महाविद्यालये तसेच इंग्रजी माध्यमाच्या, मराठी माध्यमाच्या शाळा, सीबीएस हायस्कूल आदी शैक्षणिक सर्व सुविधाने तळेगाव शहर परिपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांची शैक्षणिक सुविधांमुळे तळेगावमध्ये रहाण्यासाठी ओढ आहे. शहराच्या भोवती महाळुंगे एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी, उर्से एमआयडीसी, जवळच टाकावे एमआयडीसी वसलेली आहे. तसेच, शेतीपूरक व्यवसायदेखील गावाच्या भोवती वसलेले आहे. त्यामुळे कामगार व अधिकारी यांची तळेगावमध्ये रहाण्याची ओढ असते. त्यामुळे लोकसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
यामध्ये सचिन पवार (अतिरिक्त पदभार) 26 जुलै 2019 ते 20 सप्टेंबर 2019 पर्यंत होते. दीपक झिंजाड (कायम पदभार) 20 सप्टेंबर 2019 ते 29 जानेवारी 2021 पर्यंत, रवी पवार (अतिरिक्त पदभार) 24 ऑगस्ट 2019 ते 3 सप्टेंबर 2019 पर्यंत, नानासाहेब कामठे (अतिरिक्त पदभार) 30 जानेवारी 2021 ते 4 मे 2021, श्याम पोशेट्टी (कायम पदभार) 4 मे 2021 ते 31 जून 2021 पर्यंत होते. त्यानंतर काही अपरिहार्य कारणामुळे त्यांची बदली करण्यात आली. सोमनाथ जाधव (अतिरिक्त पदभार) 7 जून 2021 ते 8 सप्टेंबर 2021 पर्यंत, सतीश दिघे (कायम कार्यभार) 9 सप्टेंर 2021 ते 26 एप्रिल 2022 पर्यंत आणि विजयकुमार सरनाईक (कायम पदभार) 26 एप्रिल 2022 ते 24 एप्रिल 2023 पर्यंत पदोन्नती झाल्याने त्यांना पदभार सोडावा लागला. आता एन. के. पाटील यांच्याकडे कायम कार्यभार म्हणून मुख्याधिकारी पदाची जबाबदारी 24 एप्रिलपासून सोपविण्यात आली आहे.
कामे पूर्ण करण्याचे आवाहन
तळेगाव दाभाडे नगरीला सद्यस्थितीला विकसनशीलनगरी म्हणून संबोधले जात आहे. अनेक रखडलेली कामे, तसेच सुरू करण्यात आलेली कामे व मंजूर झालेली कामे करण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त मुख्याधिकारी यांचे पुढे ठाकलेले आहे. याबाबत ते कशा पद्धतीने कामाची दिशा ठरवतात याकडे निश्चितच नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. तसेच, चार वर्षांत आठ मुख्याधिकारी बदलून गेल्याची चर्चादेखील सर्वत्र होताना दिसत आहे.
सततच्या बदल्यांमुळे विकासकामांना खीळ
या नगरीला ऐतिहासिक वसा लाभलेला आहे. रणरागिनी सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या शौर्य, पराक्रम व वास्तव्याने पुणीत झालेली ही नगरी आहे. या गावामध्ये पाचपांडवाचे मंदिर, ग्रामदैवत श्री डोळसनाथ मंदिर, बनेश्वर मंदिर आदी मंदिरामुळे तसेच जुना राजवाडा यामुळे तळेगावचे वेगळेपण दिसून येत असल्याने येथे राहण्याची ओढ आहे. या सर्व बाबीमुळे तळेगाव समृध्द असतानादेखील गेल्या चार वर्षांत प्रभारी व कायम कार्यभार सांभाळणारे एकूण आठ मुख्याधिकारी या नगर परिषदेमध्ये होऊन गेले. अनेक कारणांमुळे त्यांची बदली झाली, त्यामुळे तळेगावच्या विकासकामांनादेखील खीळ बसली आहे.